मानवी स्वभाववैशिष्ठ्ये एवढी गुंतागुंतीची आहेत की, त्यांचा अंदाज करणे तपस्वी योग्यांनाही जमले नाही. जसा अनाकलनीय, गूढ, विस्मयकारक स्वभाव आहे तसाच अत्यंत लाघवी, तरल, गुणवर्धित स्वभावही माणसाला लाभला आहे. त्याच्याही पलीकडे जेंव्हा अधिक खोलात जाऊन डोकावतो तेंव्हा स्वभावाच्या नानाविध छटा आपल्याला दिसतात. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ असे आपण सहज म्हणूनही जातो. मग आपण असे समजायचे का, की प्रवृत्ती म्हणजेच स्वभाव? नक्की स्वभाव म्हणजे तरी काय? आपल्या जिवाची आवड-निवड आणि मनाचे छंद म्हणजे स्वभाव आहे का? भारतीय आध्यात्मिक तत्वज्ञान या स्वभावाचे वर्णन करीत नाही. पण अध्यात्म असे सांगते की वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती या मानवाच्या तीन अवस्था आहेत. या तिन्ही अवस्थेतून त्याचा प्रवास सुरु असतो. मग प्रश्न असा पाडतो की, या तिन्हींची मिळून जी अवस्था आहे त्याला स्वभाव म्हणावे का ?
मानवाची सहज नैसर्गिक जाणीव म्हणजे वृत्ती. त्याच्या मूळ वृत्तीला साजेसे वातावरण नसल्यास निर्माण होते ती प्रवृत्ती. आणि लौकिक अथवा सांसारिक जीवनात रममाण राहून भौतिक लाभांची व इंद्रीय सुंखांची कामना नसलेला विचार म्हणजे निवृत्ती. आपण येथे वृत्ती, प्रवृत्तीचाच विचार करुया. कारण निवृत्ती हा मोक्ष साधनेचा मार्ग आहे. संसारीकांनी त्यात वेळ दवडू नये. वरील सिद्धांतानुसार वृत्ती ही मानवाची नैसर्गिक धारणा आहे. मात्र या मूळ तत्वापासून भरकटत गेल्यामुळे मानवाचा मूळ स्वभावही बदलत जातो. परिणामी त्याच्या जीवनात अनेक संकटे निर्माण होऊन दुःख वाट्याला येते. मूळ स्वभाव बदलणे म्हणजेच स्वधर्मापासून दूर जाणे आहे. स्वधर्म कळण्यासाठी प्रथम स्वतःला जाणून घेतले पाहिजे. आपण जसे आहोत तसे न जाणण्यामुळे नित्य कल्याणरुपी स्थितीपासून आपण दूर जातो. जीवात्मा त्याच्या तात्विक वृत्तीपासून दूर जाऊन प्रवृत्तीच्या पारतंत्र्यात अडकतो. अशावेळी परतंत्र तोडण्याचे ‘स्वधर्म’ हे एकच साधन त्याच्याकडे उरते.
स्वतःचे शरीरसामर्थ्य, स्व-कर्तव्याची जाणीव, स्वाभिमान, नीतिधैर्य, विश्वास ही स्वधर्माची महत्वाची लक्षणे आहेत. स्वधर्म ही नैसर्गिक स्थिती असल्यामुळे त्याच्याठायी साहजिकच व्यसने नसतात त्यामुळे शरीर सुदृढ राहते. कर्तव्याच्या जाणिवेमुळे वाट्याला आलेली कर्मे विनासायास पार पडतात. स्वत्वाने भरलेले प्रसन्न अंतःकरण आणि नैतिक अधिष्ठानामुळे आपोआप ईश्वरचिंतन घडू लागते. ईश्वर हा शुध्द-सत्व गुणांनी युक्त असल्यामुळे त्याच्या चिंतनाने मनातील रजगुण व तमोगुण नाहीसे होऊन सात्विक भाव निर्माण होतो. कारण निसर्ग नियम असा आहे की मन ज्या विषयाचे ध्यान करते, त्या विषयाशी ते तादात्म पावते. ” ते स्वलाभ लाभलेपणें । मन मनपणाही धरु नेणें । शिवतले तैसे लवणे । आपले निज ।।” अशा शब्दात ज्ञानेश्वरांनी आणि ” जया जैसे ध्यान । तैसे होय त्याचे मन ।।” या शब्दात तुकाराम महाराजांनी मनाच्या स्थितीचे वर्णन केले आहे. स्वधर्म जागवल्यामुळे मनाने शुध्द, सत्वगुणसंपन्न झालेला मनुष्य नित्य विवेकी होऊन जातो. या विवेकी मनुष्याला कर्तव्याची जाणीव होऊन तो आपली नित्यकर्मे आनंदाने पार पाडतो.
या व्यतिरिक्त स्वधर्माची दुसरी एक बाजू आहे. ती म्हणजे व्यवहारिक जीवनात प्रत्येकाचा आपला एक स्वधर्म असतो. त्या स्वधर्माचे पालन यथायोग्य झाले तर त्याचे जीवन लौकिकार्थाने यशस्वी होते. त्याला समाज व प्रदेशात मान्यता प्राप्त होते. ‘आई वडिलांची सेवा हा माझा स्वधर्म आहे. परमेश्वरा माझे ते सेवाकार्य पूर्ण होईपर्यंत तू प्रतीक्षा कर’ असं म्हणत पांडुरंगाला विटेवर उभा करणाऱ्या पुंडलिकाचा अखंड जयजयकार आजही सुरु आहे. आसेतु सूर्य चंद्र तो सुरुच राहणार आहे! अलीकडे पाश्चमात्य संस्कृतीने अलंकृत झालेले आपलेच बांधव आईवडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात तेंव्हा ते स्वधर्म विसरलेला असतात. एवढेच कशाला, स्वतःला ईश्वराचे भक्त म्हणवणारे जेंव्हा घरातील वृध्द आईचा विचार न करता तीर्थक्षेत्राच्या दर्शनात धन्यता मानतात तेंव्हा ते स्वधर्म विसरले असे मानावे. देशाचे रक्षण हा सीमेवरील सैनिकाचा स्वधर्म आहे, रयतेच्या कल्याणाचा विचार हा राजाचा स्वधर्म आहे, शुध्द भावनेने रुग्णांची शुश्रूषा हा डॉक्टरचा स्वधर्म आहे, मुलांवर निरपेक्ष प्रेम करुन त्यांना सुसंस्कृत बनवणं हा मातापित्यांच्या स्वधर्म आहे, आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या ठिकाणी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हा कामगारांचा स्वधर्म आहे, ज्यांच्या मुळे भरभराट झाली त्यांच्याप्रती सदभाव ठेवणे हा मालकाचा स्वधर्म आहे, निष्ठावंत भाव हा भक्तांचा स्वधर्म आहे, लढणे हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे,….. आपल्या प्रत्येक भूमिकेत आपला स्वधर्म बदलत जातो. कारण कधी ना कधी आपल्याला प्रत्येक भूमिकेतून जावे लागते. त्या प्रत्येक वेळी स्वधर्माची जाणीव करुन देणारा आपला स्वभाव आपल्याला त्या अवस्थेपर्यंत पोहोचवत असतो.
भ्रमित झालेल्या अर्जुनाला त्याच्या स्वधर्माची जाणीव करुन देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी ‘गीता’ सांगितली. युध्द करणं हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे. गीतेतले संपूर्ण तत्वज्ञान आणि भगवंताचे विश्वरुप दर्शन हा सगळा प्रपंच अर्जुनाला मोहपाशातून मुक्त करुन स्वधर्माची ओळख करुन देणे हाच होता. हीच गीता ज्ञानेश्वरीच्या रुपाने प्रगट केल्यावर शेवटी पसायदान मागताना ज्ञानेश्वर म्हणाले “विश्व स्वधर्म सूर्ये पाहो.. ” प्रवृत्तीची निवृत्ती होऊन वृत्तीची स्थिती प्राप्त होणे म्हणजे स्वधर्म.. मनावर झालेला मानवतेचा संस्कार म्हणजे स्वधर्म.. जेंव्हा प्रत्येकाच्या मनातील स्वधर्म जागृत होईल तेंव्हा अखिल जगत सुखी – समाधानी होईल.
राम कृष्ण हरी.
भवःतू सब मंगलम !
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]