वारीच्या वाटेवर – कर्मफुलांनी ईश्वर पूजा : भक्तीचा अनोखा अविष्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


तेराव्या शतकात संतांनी सुरु केलेल्या नव्या भागवत भक्ती सांप्रदायाने अनेक अलौकिक सिध्दांत मांडले आणि सर्वसामान्य जनतेसाठी ईश्वर प्राप्तीचा मार्ग अधिक सुकर व प्रशस्त केला. या सिध्दांतांचा उपदेश संतांनी केवळ ग्रंथांव्दारे केला नाही तर तसे जीवन जगून त्यांनी ते सिध्दांत सप्रमाण सिध्द करुन दाखवले. कोणतेही कर्मकांड न करता आपला संसार, प्रपंच सांभाळून, आपली कर्तव्य व कामे निष्ठापूर्वक करुन परमेश्वराची भक्ती करता येते हा त्यातील एक सिध्दांत.

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥
चराचर सृष्टीत व्यापून राहिलेल्या आणि सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या सर्वात्मक शक्तीला संतुष्ट करण्याचे वर्म ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीत सांगितले आहे. ज्याला स्वतःच्या अंतरात्म्याला प्रसन्न करुन घ्यायचे असेल त्याने त्याच्या वाटेला आलेले कर्मच फूल समजून ईश्वराला अर्पण करावे. ईश्वराला फळा-फुलांची नव्हे तर मनोभावे केलेल्या कर्माची भूक आहे. त्या शुध्द कर्माने तो प्रसन्न होतो. कर्मयोगातील हा श्रेष्ठ सिध्दांत माउलींनी येथे विशेषत्वाने सांगितला आहे.

आपल्या हातून कधी कळत तर कधी न कळत कर्मे होतच असतात. कर्माशिवाय आपल्याला राहता येत नाही. पापणीची उघडझाप, झोपेत घेतलेला श्वास ही न कळत होणारी कर्मे आहेत. आणि आपण शिक्षण घेतो, आपला व्यवसाय करतो, नोकरीच्या ठिकाणी काम करतो, जेवतो, खातो, कोणाला मदत करतो, वैयक्तिक-सार्वजनिक कामे करतो ही सारी ठरवून केलेली कर्मे आहेत. कळत, न कळत केलेल्या या सर्व कर्मांना फूल समजून त्या फुलांनी तू माझी पूजा कर! यापेक्षा माझं तुझ्याकडं काही मागणं नाही असं साक्षात परमेश्वराच म्हणणं आहे. गीतेमध्ये त्याने ते प्रगट केले आहे. भगवंताचे ते तत्वज्ञान आपल्याला सांगत असताना ज्ञानेश्वरांचा भाव अत्यंत सात्विक आहे. पण त्यांनी तुमच्या माझ्यावर टाकलेली जबाबदारी तेवढीच अवघड आहे. कर्म करायचं आणि फूल समजून ते परमेश्वराला अर्पण करायचं हे आपण समजतो तेव्हढं सोपं आहे का? आपल्याकडून अनेक दुष्कर्म होत असतात. ती परमेश्वराला कशी अर्पण करणार? म्हणजे आपल्याला प्रथम वाईट विचारांचा, दुष्कर्मांचा त्याग करावा लागेल. परमेश्वराला जे फूल वाहायचे ते अनर्घ असले पाहिजे. ते वापरलेले असून चालणार नाही, हुंगलेले चालणार नाही, कोमेजलेले चालणार नाही, पायदळी तुडवलेले तर नाहीच नाही. ते कर्मफूल स्वच्छ, ताजे, टवटवीत, प्रसन्न आणि शुध्द असले पाहिजे. त्याचा लाभ प्रथम ईश्वराला मग प्रसाद म्हणून इतरांना झाला तर काही हरकत नाही. कर्म जेंव्हा आपण ईश्वरासाठी करु तेंव्हा ते ताज्या, सुगंधित फुलाइतकेच निष्कलंक असले पाहिजे. परमेश्वराची कर्म फुलांनी करायची पूजा सुरुवातीला सोपी वाटली पण आता ती किती अवघड आहे लक्षात घ्या. कळत अथवा न कळत होणारे आयुष्यातील प्रत्येक कर्म पवित्र असेल याची दक्षता घेणाऱ्यालाच त्या पूजेचा अधिकार सांगता येईल.

ज्ञानेश्वरांनी येथे प्रचंड मोठे काम साधले आहे. ताजी फुलं आणून देवाच्या मस्तकी चढवणे किंवा देवाला अर्पण करणे सोपे आहे. पण आपली कर्मे देवाला अर्पण करायची आहेत त्याअर्थी ती वाईट, अपवित्र असून चालणार नाहीत. दुसऱ्यांना दुःख देणारी तर नाहीच नाही. ती कर्मे चांगलीच केली पाहिजेत. अशारितीने परमेश्वराची पूजा करण्याचा संकल्प जर सर्वांनी केला तर सगळे जग पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. पूजेचा सोपा मार्ग दाखवण्याच्या भरात ज्ञानेश्वर संपूर्ण जगाला निष्कलंकतेची दिक्षा देऊ पाहताहेत हे लक्षात घ्या. आणि त्याचवेळी आपले विहित कर्म बाजूला न करता ते कर्म शुध्दभावनेने करुन तुम्ही परमेश्वराची भक्तीपूजा करु शकता. हा सोपा मार्ग सर्व सामान्य लोकांना दाखवून प्रत्येकाला पूजेचे पावित्र्य मिळून जाईल व त्याच पूजेने परमेश्वर अती प्रसन्न होईल असा विश्वास ज्ञानेश्वर आपल्या विचारातून व चरित्रातून अधोरेखित करतात.

भागवत धर्माने, वारकरी सांप्रदायाने सामान्य जनतेसाठी परमेश्वर भक्तीचा सोपा अभ्यासक्रम दिला आहे.
देवाचिये व्दारी, उभा क्षणभरी ।
तेने मुक्ती चारी साधियेल्या ॥
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥
ईश्वरभक्तीसाठी काहीही सोडावं लागणार नाही. घर सोडू नका, व्यवसाय सोडू नका, तुमची नित्यकर्म सोडू नका. फक्त ती सर्व कर्मे करत असताना मुखाने हरिनाम म्हणा. अंतःकरणात ईश्वरप्रेमाचा कळवळा असुद्या. तो एक क्षण तुम्ही परमेश्वरासाठी द्या. घरादाराच्या, व्यवसायाच्या जबाबदाऱ्या न पाळण्याची कसलीही सबब येथे संतांनी तुम्हाला मिळू दिलेली नाही. संत सावता महाराजांनी त्यासाठी स्वतःचा कर्मयोग सांगताना म्हटले.. कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।। सावत्याने आपले शेतच ईश्वर मानले. त्याची मनोभावे सेवा केली आणि त्यातून पिकवलेल्या भाजीपाल्यात त्याला ईश्वराचे दर्शन घडले. सजन कसाई तर खाटीक होता. मांस विक्रीचा एवढा अप्रिय, कटू व्यवसाय करीत असतानासुध्दा परमेश्वराच्या प्रेमाचा आल्हाद त्याला अनुभवायला मिळत होता. आपल्या शुध्द कर्माने सजन कसाई संतत्वाला पोहोचला. यापेक्षा वेगळी पूजा ईश्वराला अपेक्षित नाही. जी कोणती तुमची कर्मे असतील ती ईश्वरार्पित बुद्धीने, प्रामाणिकपणे, मनात शुध्दभाव धरुन केलीत तर परमेश्वराची वेगळी भक्ती करायची गरज नाही. तुम्ही ‘मोक्ष’ मार्गाचे सांगातीं व्हाल हा ठाम विश्वास संतांना आहे.

‘उभारुन बाहे, विठू पालवीत आहे’॥ पण हा अनुभव वर्षातून फक्त दोनदाच आहे बरं का! पंढरीश परमात्म्यानेच तसे स्पष्ट सांगून ठेवले आहे. आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग॥ हाच धागा पकडून संतांनी कर्मयोगाचा सिध्दांत मांडत असताना आषाढी वारीच्या निमित्ताने सांप्रदायाच्या आराध्याच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरली आहे. तो भव्य-दिव्य पालखी सोहळा आज वेळापूर ओलांडून भंडीशेगावच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

राम कृष्ण हरी.
भवःतू सब मंगलम !

© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]


Back to top button
Don`t copy text!