दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । फलटण । मानवी जीवन अत्यंत जटिल आहे. जन्मापासून अंतापर्यंत अनेक समस्यांनी, व्याधींनी, मनोविकारांनी त्याला जखडून ठेवले आहे. मानवीय, अमानवीय आणि नैसर्गिक आपत्तींनी, संकटांनी त्याला सतत ग्रासले आहे. या सर्वांतून तरुन जायचे असेल व जीवनात सुखाचे, आनंदाचे क्षण अनुभवायचे असतील तर एक मार्ग आहे तो म्हणजे आत्मशुध्दी.! हा उपदेश करणारी भारतीय संत परंपरा जगातील यच्चयावत मनुष्य-मात्रांना आपल्या पोटाशी कवटाळून सांगते, ‘जाग रे पुत्रराया, जाई श्रीगुरु शरण.’
काळ अखंडपणे प्रवाहित आहे. गतिमान असणाऱ्या या काळाच्या उदरात कितीतरी वैश्विक स्थित्यंतरे घडली असतील, जी आपल्याला ज्ञात नाहीत! अशाच एका अज्ञात क्षणी भूतलावर सजीव सृष्टी अस्तित्वात आली. या सजीव सृष्टीची उत्क्रांत प्रक्रिया सुरु होऊन एका दिव्य क्षणी पृथ्वीवर मानवाची निर्मिती झाली. मानवी सृष्टी अस्तित्वात आली, ती वैचारिक क्षमता बरोबर घेऊनच! त्याच्या विचारशक्तीला आव्हान देणारे असंख्य प्रश्न निर्माण झाले. त्यावर मात करण्यासाठी तो नानाविध उपाय शोधू लागला. त्यातूनच मानवाच्या हातून स्वैर वर्तन घडू लागले. मात्र त्याचवेळी, मानवाला प्राप्त झालेल्या वैचारिक क्षमतेतून त्याच्यात विवेकबुध्दीही जागृत झाली. विवेकी लोकांनी आपल्यापुढील प्रश्नांची उकल करण्यासाठी आत्मचिंतनाचा मार्ग स्विकारला. तेंव्हापासून जगात दोन धारदार प्रवाह वाहू लागले. या प्रवाहांतूनच विज्ञानाची व तत्वज्ञानाची निर्मिती झाली. हे दोन्हीही समांतर वाटत असले तरी अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचे असेल तर विवेकनिष्ठ तत्वज्ञानाची कास आपल्याला सोडता येणार नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला विवेकी होण्यासाठी श्रीगुरुंच्या मुखातून अमृत वचने श्रवण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाने म्हणूनच गुरु परंपरा अधिष्ठित मानून आपले तत्वज्ञान मांडलेले दिसते.
बाह्य जगतातील अनेक अडचणी व संकंटांमुळे आपले जीवन कष्टप्रद, दुःखमय होते असे वाटत असले तरी दुःखाचे तेच एक कारण नाही. त्याहीपेक्षा मनुष्याच्या आत खोलवर रुतून बसलेल्या विकारांनी अधिक संकटे ओढावून घेतली आहेत हे तो सोईस्करपणे विसरतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांमुळे मानवी जीवन अधिक दुःखी-कष्टी होत आहे. यातून एवढे अनर्थ ओढवतात की जगण्याचा खरा मतितार्थ विसरला जातो. उदाहरण म्हणून पाहूया.. लोभातून निर्माण होते संपत्तीची हाव. इतरांवर अन्याय करुन, प्रसंगी त्यांची फसवणूक करुन व निसर्गाचा नाश करुन संपत्ती कमवण्याकडे लोभी माणसाचा कल वाढतो. जगासमोरील आजची सारी संकटे ही अमाप संपत्ती गोळा करण्याच्या मनुष्याच्या लोभातूनच निर्माण झाली आहेत. या अर्थलोभापायीच मनुष्य सगे, सोयरे, स्नेही यांच्यापासून दुरावतो, आपल्या जिवलग मित्रांनाही गमावून बसतो. ऐवढे सारे अनर्थ ‘लोभ’ या एका विकारातून निर्माण होतात. इतर विकारांचा विचार लेखन मर्यादेमुळे येथे करता येणार नाही. तुम्ही तुमच्याच मनाला प्रश्न विचारा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे विकार रहीत ‘मन’ तयार करणे. त्यासाठी हवी आत्म्याची शुध्दी. योग्य मार्गदर्शनाशिवाय आत्मशुध्दी होत नाही. म्हणून मनुष्याला गरज आहे विवेकनिष्ठ मार्गदर्शकाची, श्रीगुरुंची.
मदालसा आपल्या मुलाला उपदेश करताना म्हणते.. ‘मुला जागा हो. गुरुला शरण जा. देह बुध्दी सोडून जन्म मरणाची यातना चुकव. पराधीनतेसारखे दुःख कोणते असणार? आणि इतके करुनही काय मिळवशील? काही विषय संपादन करशीलही पण मधाच्या पोळ्यातील मध लोक जसा लुटून नेतात, तसा तुझा तो सारा विषय इंद्रिये लुटून नेतील आणि तू उघडा पडशील. म्हणून हा उपदेश ऐक. गुरुंना शरण जा; तुला सुख लाभेल.’ येथे मदालसेने तीच्या मुलाला केलेला उपदेश प्रतीकात्मक मानून त्याचा संदर्भ देत ज्ञानेश्वर महाराजांनी अखिल जगतातील मानवांना पुत्र मानून अभंगाव्दारे उपदेश केला.
जाग रे पुत्र राया जाई श्रीगुरु शरण
देह तू व्यापिलासी चुकवी जन्म मरण
गर्भ-वास वोखटा रे येथे दुःख दारुण
सावध होई का रे पुत्र सुजाण
बहुत शिणतोसि पाहता या विषयांसि
जाण हे स्वप्न-रुप येथे नाही बा दुजे.
सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छंदु
माशियां मोहळ रे रचियेला रे कंदु
जाणतेया उपदेशु नेणे तो भ्रांती पडिला
तैसा नव्हे प्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला
अनुभवी गुरु – पुत्र तो चि स्वयें बुझाला
ऐके तया उध्दरण गायक सहज उध्दरला.
हा अभंग म्हणजे ज्ञानेश्वरांच्या विलक्षण प्रतिभेचा अविष्कार आणि साक्षही आहे. श्रीगुरुंना शरण जा असे सांगताना गुरु अनुभवी, ज्ञानी असावा हे सांगायला ते विसरत नाहीत. वस्तुतः जो जाणता आहे त्याला उपदेशाची गरज नाही कारण या जगात उपदेशच भरलेला आहे. कदाचित जाणते लोक तो शोधू शकतील पण जे नेणते आहेत त्यांना गुरुंच्या मार्गदर्शनाची गरज आहे. येथे नेणता म्हणजे ज्ञानेश्वरांना सामान्य माणूस अभिप्रेत असावा. हा नेणता नेहमी भ्रमात सापडतो आणि चोरांच्या संगतीत जाऊन घात करुन घेतो. काम, क्रोध, लोभ हे त्रिकुट ‘चोर’ आहे. ते मनुष्याला चांगल्या मार्गाने जाऊ देत नाही आणि परमार्थात शिरु देत नाही. या त्रिकुटासह परमार्थात शिरणे म्हणजे केवळ वेडेपणा आहे. अशा वाट चुकलेल्या माणसाला प्रकाश लाभत नाही. प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. आपल्या जीवनात हा प्रकाश यावा यासाठी गुरुंना शरण जा असे सांगून ज्ञानेश्वर महाराज स्वानुभवावरुन म्हणतात.. ‘माझे श्रीगुरु ज्ञानी आहेत, ते अनुभवी होते म्हणून त्यातले मर्म मला सहज समजले. हा उपदेश ऐकणाराचा अवश्य उध्दार होईल. कारण अभंग गाणारा मी स्वतः उध्दरलो आहे.’
मित्रांनो, भारतीय संस्कृती आणि भारतीय संतांचे तत्वज्ञान हे जगोद्धाराचे आहे. त्याला कोणत्याही सीमांचे बंधन नाही. संभ्रांत झालेल्या समस्तांना ते आपला मानून मार्गदर्शन करतात. म्हणूनच ज्ञानेश्वरांच्या मुखातून शब्द उमटले… ‘जाग रे पुत्र-राया, जाई श्रीगुरु शरण’.
|| राम कृष्ण हरी || भवःतू सब मंगलम ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]