दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । फलटण । महाराष्ट्राला बौध्दिक प्रगल्भता आणि आधुनिक विचारांनी समृध्द करण्यात इंद्रायणी काठाचे योगदान अनन्यसाधारण आहे. भारतातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो. सांस्कृतिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक असा सर्वार्थाने प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यात जी विचारधारा कारणीभूत ठरली तीचे उगमस्थान म्हणजे हा इंद्रायणीचा काठ आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी रोवलेली बीजे आज फळाफुलांनी डवरली आहेत. ‘इवलेसे रोप लावियले व्दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ याचा प्रत्येय म्हणजे आजचा महाराष्ट्र आहे. या भूप्रदेशात ‘झाले बहू, होतील बहू’ पण ज्ञानोबा – तुकोबा ही नावे घेतल्याशिवाय कोणालाही पुढे जाता येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. इंद्रायणी काठ म्हणूनच महत्वाचा आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे इंद्रायणी नदी आणि तीच्या काठावरील जी माहिती मला ज्ञात झाली अथवा माझ्या मनाला भावली ती मागील दोन लेखात संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला. आज जगद्गुरू तुकाराम महाराजांविषयी माझ्या अल्पबुद्धीला जे जमेल ते सादर करुन ‘इंद्रायणी काठी’ हा विषय पूर्ण करण्याचा मानस आहे.
जगद्गुरु तुकाराम.. ‘अणुरेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा’ या दोन ओळींतूनच तुकाराम महाराज हे किती विलक्षण व्यक्तिमत्व होते याचे दर्शन आपल्याला घडते. महाराष्ट्र भूमंडळी प्रत्येक घरात संत तुकारामांचे अभंग शेकडो वर्षांपासून आळवले जातात. अक्षरओळख नसलेल्या बायाबापड्यांनाही अनेक अभंग तोंडपाठ आहेत. तुकाराम आपल्याच सुख-दुःखाची भाषा बोलतात ही भावना येथील जनमानसात खोल पर्यंत रुजली आहे. ज्ञानेश्वर म्हणजे आकाश गंगेसारखे विशाल, नितळ आहेत तर तुकाराम म्हणजे याच आकाशात तेजोमय होऊन संचार करणारी वीज आहेत. तुकारामांच्या शब्द सामर्थ्याने दगडाला पाझर फुटला, लोह वितळले आणि अभंग पाण्यावर तरंगले. हे सामर्थ्य केवळ त्या शब्दांना नव्हते, तर त्या शब्दांमधून व्यक्त झालेल्या सामान्य कष्टकऱ्यांच्या व्यथांची ती शक्ती होती. ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानीयेलें नाही बहुमतां’ असे म्हणणारे तुकाराम लोकांना आपले वाटले म्हणूनच ‘तुकोबा’ होऊन ते त्यांच्या हृदयात जाऊन बसले.
पुण्यापासून दहा कोसांवर इंद्रायणीच्या तीरी असलेल्या देहू गावातील मोरे उपनाम असलेल्या कुलीन कुटुंबात तुकोबांचा जन्म झाला. देहूच्या या मोरे घराण्याचे पूर्वज मूळचे साताऱ्याजवळच्या जावळी खोऱ्यातील. तुकोबांचे पूर्वज जातीने ‘कुणबी’ असले तरी किराणा व धान्य खरेदी-विक्री करुन वाण्याचा व्यवसाय करीत. धंद्यातील भरभराटीमुळे या कुटुंबाला पंचक्रोशीत मोठी प्रतिष्ठा होती. तुकोबांचे सातवे पूर्वज विश्वंभरबोवा हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. दर पंधरादिवसांची पंढरीची वारी हा त्यांचा नेम होता. त्यांची पत्नी आमाबाई सुध्दा अत्यंत भाविक होत्या. यांचे दोघे पुत्र हरी व मुकुंद लढाईत मारले गेले; मुकुंदाची बायको सती गेली! त्यावेळी हरीची बायको गर्भवती होती ती प्रसूत झाली व तीला मुलगा झाला, त्याचे नाव विठोबा. पुढे विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकरचा मुलगा कान्होबा, कान्होबाचा मुलगा बोल्होबा. याच बोल्होबांचा मुलगा आपले ‘तुकोबा’ ! तुकोबांच्या सातआठ पिंढ्यांमध्ये नियमाने आषाढी – कार्तिकीची वारी करणारे श्री.विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त होते. या सर्वांच्या पुण्याईने आणि ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या न्यायाने मोऱ्यांच्या सर्व वंशांचा उध्दार करुन तिन्ही लोकी कीर्तीचा झेंडा मिरवणारा सुपुत्र आई कनकाईच्या पोटी जन्माला आला. धन्य ती कनकाई आणि धन्य तो तुकोबा.!
अनुताप ही परमार्थाची पाहिली पायरी मानली जाते. तत्कालीन परिस्थितीच्या परिणामांनी तुकोबांना अनुताप झाला आणि ‘जे काही करीतो ते माझे स्वहित, आलीसे प्रचीत कळो चित्ता’ असे म्हणून भजन किर्तनास जाण्याचा परिपाठ त्यांनी सुरु केला. अतीव आदराने व विश्वासाने ज्ञानेश्वर, कबीर, नामदेव, एकनाथ आदी संतांची वचने अभ्यासण्यात तुकोबा तद्रूप झाले. पुढे एका अभंगात तुकोबाच सांगून गेले ‘नव्हते अभ्यासी चित्त आधी’ व ‘लाज नाही मनी येऊ दिली’. या साऱ्याचा परिपाक होऊन ‘एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईच्या पती’ अशी भावस्थिती तुकोबांची झाली. पुढच्या काळात पूर्ण वैराग्य प्राप्त झालेला एक महान संत तुकोबांच्या रुपाने या जगाला लाभला. ज्याने या जगतातील सारे दुःख, दैन्य दूर व्हावे यासाठी आपली वैखरी समर्पित केली. कधी अत्यंत कठोर तर कधी अत्यंत मऊ, मुलायम शब्दात त्यांनी आपली कळकळ व्यक्त करताना ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसें’ असे स्पष्ट शब्दात सुनावले. लोक-कल्याण हा त्यांच्या जिवाने घेतलेला ध्यास होता. त्यासाठी त्यांचे मन व्याकुळ होत होते. प्रचलित रुढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि बुवाबाजीमध्ये गुरफटलेला समाज त्यातून मुक्त करावा तसेच अज्ञानी, जडमूढ समाजावर अन्याय करणाऱ्या, त्यांची फसवणूक करणाऱ्यांपासून त्यांना सावध करावे यासाठी तुकोबांची ही सगळी धडपड होती. ‘होईल तैसे बळ, फजीत करावे ते खळ’ इतक्या कठोर शब्दात तुकोबा समाजमन घडविण्यासाठी बोलत होते. त्याचवेळी त्या खळांनाही ते गोंजारुन सांगत होते ‘जग तरी आम्हा देव, परि निंदितो स्वभाव | येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणुनी काळा ||’ काळाच्या हाती जीव पडतात हे आम्हाला पाहवत नाही, म्हणून त्यांच्या हितासाठीच त्यांच्या स्वभावाची मी निंदा करत आहे, एरवी सारे जग आम्हा देव आहे !
ज्ञानोबांच्या नंतर मधल्या दोनतीनशे वर्षांत सुस्तावलेले समाजमन जगविणे गरजेचे होते. त्यांनी रचलेला पाया अधिक व्यापक करण्याची आवश्यकता होती. अशा वेळी जनमानसाचा स्वभावधर्म बदलण्यासाठी लोकांनी श्री.विठ्ठल चरणी लीन व्हावे हा आग्रह तुकोबांनी धरला. त्यासाठी वारकरी सांप्रदायाची दिव्य पताका हाती घेऊन किर्तनाचा खेळ गावोगावी मांडला. ईश्वरभक्ती बरोबरच प्रबोधन व जागृती हा त्यांच्या किर्तन सेवेचा विषय झाला. हळूहळू जनमानस बदलू लागले. एका नव्या युगाचा आरंभ सुरु झाला. भल्या बुऱ्याची जाणीव लोकांना होऊ लागली. त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘रयतेचे स्वराज्य’ निर्माण करण्याचा संकल्प सोडला होता. तुकोबांच्या जाज्वल्य वाणीने आणि तळमळीच्या शब्द सुमनांनी स्वराज्य स्थापनेलाही बळ मिळाले. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’ असे म्हणत तुकोबांनी वैष्णवांचा मेळा गोळा केला. महाराष्ट्र देशी पुन्हा हरिनामाचा अखंड गजर सुरु झाला. तुकोबा प्रत्येकाच्या घरोघरी आणि हृदयात पोहोचला.. वारकरी सांप्रदाय बहराला आला.. ज्ञानदेवांनी रचलेल्या पायावर दिव्य देवालय उभे राहिले आणि… ‘तुका झालासे कळस’ याची प्रचिती महाराष्ट्राला आली. तुकोबारायांचे उपकार तुम्ही आम्हीच नव्हे तर अवघा महाराष्ट्र विसरु शकणार नाही.. इंद्रायणी काठी सोळाव्या शतकात संत तुकाराम जन्माला आले. त्यांनी अवघा समाज सुखी केला, दिन-दुबळ्यांना सुखी व समृध्द जीवनाचा मार्ग दाखवला. महाराष्ट्र आजही त्याच मार्गाने चालला आहे.. म्हणूनच म्हणण्याचा मोह होतो ‘धन्य तुकोबा समर्थ’ !!
|| भवतु: सब मंगलम | राम कृष्ण हरी ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]