
दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । फलटण । श्री. विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या वारकऱ्यांना, भक्तांना आणि तमाम मऱ्हाठीजणांना आजचा दिवस म्हणजे ‘धन्य आजि दिनू अमृते पाहिला’ ही अनुभूती देणारा आहे. विशेषतः वारकरी ज्या देवशयनी आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहात असतात, तोच आजचा दिवस; क्षेत्र पंढरपूरची वार्षिक यात्रा. आषाढी एकादशीला पंढरपूरला जायचे, चंद्रभागेत स्नान करुन पुंडलिकाचे दर्शन घ्यायचे, ‘बारी’चा अंदाज घ्यायचा, आटोक्यात असेल तर दर्शन रांगेत उभे राहायचे नाहीतर नामदेव पायरीवर माथा टेकून मंदिर प्रदक्षिणा करायची. कळसाचे दर्शन घेऊन तिथूनच विठुरायाला दंडवत घालायचा. वर्षानुवर्षे वारी करणाऱ्या वारकऱ्यांची ‘वारी’ अशापध्दतीने पूर्ण होते. विश्वनियंत्या भगवंताचे आषाढी एकादशीला प्रत्यक्ष दर्शन नाही झाले तरी वारी पूर्ण होते हा वारकऱ्यांचा ठाम विश्वास आहे. शरीरात प्राण असेपर्यंत प्रतिवर्षी या दिवशी पंढरपूरला जाणारे हजारो वारकरी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. पाऊस, वारा आणि उन्हाची पर्वा न करता पस्तीस ते चाळीस तास रांगेत उभे राहून दर्शन घेणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही कित्येक लाखाच्या घरात आहे. दशमीपासून पौर्णिमेपर्यंत साधारण पंचवीस लाख वारकरी पंढरपुरात येऊन जातात. सर्वांना विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ मिळतोच असे नाही. देहू-आळंदीहून पालखीसोबत निघालेल्या ‘पायी’वारीतील वारकरी सहसा एकादशीच्या दिवशी दर्शनाचा अट्टाहास करीत नाहीत. तिथीचा क्षय अथवा वृध्दीनुसार कधी अठरा तर कधी वीस-एकवीस दिवस ज्ञानोबा, तुकोबांसोबत चालणारा हा वैष्णवांचा मेळा प्रत्यक्ष दर्शनाची अपेक्षा करीत नाही. पायीवारीत संतांसह साक्षात पांडुरंग सोबत चालत असतो अशी त्यांची दृढ धारणा आहे. चंद्रभागेत स्नान व प्रदक्षिणा करुन आपल्या मठावर अथवा राहुटीत भजन, किर्तनात तो तल्लीन असतो. वर्षभर पुरेल एवढा अबीर, गोपीचंदन, अष्टिगंध, तुळशीची माळ हा बाजार खरेदी करण्यातही तो दंग असतो. काही वारकरी टाळ, पखावज, ग्रंथ तर काहीजण पंढरपुरी घोंगडी, सोलापुरी चादर आवर्जून खरेदी करतात. या वस्तू येथेच खात्रीशीर व योग्य किमतीत मिळतात अशी त्यांची खात्री आहे आणि ती चुकीचीही नाही. मी कालच्या लेखात म्हटलं होत की पंढरपूर हे वारकऱ्यांना आपले माहेर वाटते. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगातून तीच भावना व्यक्त करतात.. ‘जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥’
मी, गेली पस्तीस वर्षे पंढरपूरची वारी करत आहे. माझे अवलोकन व अनुभव तसेच आधीच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवरुन पंढरपूर म्हणजे वारकऱ्यांचा जन्मोजन्मीचा विसावा आहे अशी माझी खात्री झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येथे येतात. विशेषतः निष्ठावान वारकरी प्रतिवर्षी नित्यनेमाने येत असतात. वारकऱ्यांना पंढपुर क्षेत्रात आल्यावर जो आपलेपणा वाटतो तो इतर तीर्थक्षेत्रात जमलेल्या भाविकांमध्ये अभावानेच दिसतो. रुक्मिणी आणि विठ्ठल हे त्याला मातापित्यांच्या ठायी आहेत. या परमेश्वरावर त्याचे अत्यंत प्रेम आहे, विश्वास आहे, श्रध्दा आहे. निष्ठा तर ओसंडून वाहताना दिसते. पंढरपुरात मी अशी काही ठिकाणं पाहिली आहेत की, शेकडो वर्षांपासून पिढ्यांपिढ्यांचे वारकरी त्याच ठिकाणी राहायला जातात. दोन-तीन दिवसांचाच विषय असतो पण तिथेच जाऊन हक्काने पिशवी ठेवायची ही त्याची सवय आहे. मोडकळीला आलेलं ते घरसुध्दा त्याच्या श्रध्येचा विषय झाले आहे. घर मालकही दुसऱ्या कोणाही वारकऱ्याला तेथे थारा देत नाही. कारण आपला नित्याचा वारकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीतरी येणारच याची त्याला खात्री असते. वारकऱ्यांचं पंढरीशी जडलेलं नातं इतक विलक्षण आहे. एकमेकांकडे जाऊन भेटणे आणि जात, पंथ, वर्ण तसेच वयाचा अथवा ज्ञानाचा विचार न करता एकमेकांच्या पाया पडणे यागोष्टी जबाबदारी असल्यासारख्या पार पाडल्या जातात. मग कुटुंबातील इतर माणसांची विचारपूस करणे, गावातील किंवा पंचक्रोशीतील भजनीबुवा, गायक, वादक यांची ख्यालीखुशाली विचारणे हे असतेच. एखादा नित्याचा वारकरी दिसला नाही तर मनात प्रथम धस्स होते. अगोदर त्याची माहिती घेऊन मगच पुढील पाहुणचार. महाराष्ट्राच्या सर्वदूर कानाकोपऱ्यातील वारकऱ्यांच्या वर्षानुवर्षे भेटीचे हमखास ठिकाण म्हणजे पंढरपूर. काही प्रमाणात देहू आळंदीचा अपवाद वगळता देशातल्या इतर कोणत्याही तीर्थक्षेत्रात असे चित्र तुम्हाला दिसणार नाही.
पंढरपूरचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, येथे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला ‘माऊली’ म्हणूनच संबोधते. आणि वाळवंटातील दृष्य तर फारच मनोवेधक असते बरं का! ओळख असो- नसो, वाळवंटात प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडून दर्शन घेत असतो. हे पाया पडणे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराचे घेतलेले ते दर्शन असते. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’ अथवा विठ्ठल जळी स्थळी भरला असून प्रत्येकाच्या अंतःकरणात तो आहे हा वारकरी सांप्रदायाचा विश्वात्मक विचार वारकऱ्यांच्या वृत्तीत आणि कृतीत उतरलेला येथे पाहायला मिळतो. कालपरवाचा वारकरी असो अथवा प्रथमच आलेला यात्रेकरु असो, सगळेजण त्यात मिसळून जातात. वारकऱ्यांना गुरुस्थानी असलेल्या संतांवर त्यांची जी अढळ निष्ठा आहे त्याचे हे प्रतीक आहे. अशी गुरुनिष्ठा सामुदायिक पातळीवर, येवढ्या मोठ्या प्रमाणात कोठे पाहायला मिळते? आणि हो! येथे केवळ पांडुरंगाच्या दर्शनाची आस नाही तर संत दर्शनाची, संत समागमाची, वैष्णव भक्तांच्या भेटीची तळमळही आहे. देहू आळंदीहून निघाल्यापासून प्रत्येक वारकऱ्याला ओढ असते परमेश्वराच्या भेटीची पण संपूर्ण रस्ताभर जयघोष असतो ज्ञानोबा – तुकोबांचा. वारकऱ्यांच्या मनात आपल्या सांप्रदाय प्रवर्तकांबद्दल असलेली ही श्रध्दा व निष्ठा अलौकिक, अवर्णनीय आहे. माझ्या मनाला ती अत्यंत भावते.
यात्रेकरुंच्या हृदयात, नामदेव पायरीच्या स्तंभात, मंदिरावरील कळसात दिसलेल्या विठुरायाचे दर्शन घेऊन तृप्त झालेल्या आणि महत्प्रयासाने विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन झालेल्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते…
पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा ।
विठा देखियेला डोळां बाईये वो ।।
वेधलें वो मन तयाचिया गुणीं ।
क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ।।
पौर्णिमेचे चांदणे क्षणाक्षणां होय उणें ।
तैसें माझे जिणें एका विठ्ठलेंविण ।।
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलुचि पुरें ।
चित्त चैतन्य मुरे बाईये वो ।।
उद्या व्दादशीचे पारणे फेडून परतीच्या मार्गावर निघणारऱ्या वारकऱ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी असणार आहे का ?
राम कृष्ण हरी.
भवःतू सब मंगलम !
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]