स्थैर्य, सातारा, दि ३ : सन 1972 च्या दुष्काळात येथील विठ्ठलाई डोंगर पायथ्याला वाघझरा परिसरात वनहद्दीत पाझर तलाव बांधला. मात्र, त्याची झालेली दुर्दशा आणि दुर्लक्षामुळे तो इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळात रोजंदारीतून तो ग्रामस्थांनी उभारला आहे. भविष्यात शेतीला वरदान ठरवा म्हणून तो बांधण्यात आला. मात्र, त्यात अद्याप मोठ्या प्रमाणात पाणीसाठा कधीच झालेला नाही.
तलावाचे बांधकाम होताना ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे. प्रारंभीपासून तळभागातून सुरू झालेली गळती आजअखेर कायम आहे. दोन वर्षांत समाधानकारक पाऊस होऊनही मोठ्या प्रमाणात पाणी त्यातून सध्या वाया जात आहे. तलावाची खोली मोठी आहे. पाणीसाठवण क्षमताही मोठी आहे. गळतीमुळे पाणीसाठा आताच तळाला गेला आहे. तलाव गाळाने भरलेला आहे. आतमध्ये झाडेझुडपे वाढली आहेत. दुरुस्तीविना तो दृष्टिआड झाला आहे. त्याचे खोलीकरण, गाळ काढणे, गळती काढण्याची मागणी ग्रामस्थांची कायम आहे. त्याची दुरुस्ती झाल्यास त्याखालील शेकडो हेक्टर शेतीचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटणार आहे. वनहद्दीतील वन्यप्राण्यांसह वृक्षांची तहान उन्हाळ्यात त्यामुळे भागणार आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
संबंधित विभागाकडे तलाव दुरुस्तीबाबत प्रस्ताव वारंवार पाठविले आहेत. मात्र, ते धूळखात आहेत. येथील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील तलाव दुरुस्तीची सूचना संबंधित विभागाला केली होती. त्यानंतर उपवनसरंक्षक अनिल अंजनकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षापूर्वी त्याची पाहणी केली होती. दुरुस्तीचा सर्व्हेही केला आहे. ग्रामसभेने वारंवार ठराव करून संबंधित विभागाला दिले आहेत. मात्र, उपाययोजना कागदावरच रेंगाळत आहेत. जलयुक्त शिवारमध्ये गावचा समावेशही झाला आहे. त्यातूनही जलसंधारणाची ठोस कामे व्हावीत, अशी मागणीही येथील जनतेची कायम आहे.