दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | फलटण | फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्याने 2017-18 च्या हंगामातील बिल ऊस उत्पादक शेतकऱयांना बिल दिले नाही. उलट न्यायालयाकडून शेतकऱ्यांनाच नोटीसा बजावल्या आहेत. चार दिवसात कारखान्याची मुजोरी थांबली नाही तर बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली मस्तवाल कारखानदारास प्रहार जनशक्ती पक्षाकडून धडा शिकवला जाईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा, सोलापूर संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेला अपंग क्रांती आंदोलन सातारा जिल्हा अध्यक्ष अमोल कारंडे, प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष महेश शिंदे, सागर गावडे, फलटण तालुका अध्यक्ष विद्या कारंडे, पाटण तालुका अध्यक्ष सुभाष मुळीक, सतीश पाटील, दिलावर काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंभूराज खलाटे म्हणाले, न्यू फलटण शुगर कारखान्याच्या संदर्भात गळीत हंगाम 2017-18मधील शेतकऱ्यांचे 12 कोटी रुपये येणे बाकी आहे. कारखाना एन.सी.एल.टी न्यायालयाच्या माध्यमातून श्री. दत्त इंडिया लि या कंपनीने घेतला आहे. या कंपनीचे संचालक जितेंद्र धारु हे सातत्यांने शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. खरेतर एन.सी.एल.टी. न्यायालय स्थापन होण्याच्या अगोदरपासून तात्कालिन फलटणचे प्रांताधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी 48 कोटी रुपये देणे असल्याची यादी उपलब्ध केली होती. परंतु दुर्दैवाने एन.सी.एल.टी न्यायालयामध्ये अर्ध्या शेतकऱ्यांची यादी सादर करण्यात आली. यापुढे जावून संबंधित कारखानदारांनी मागील गळीत हंगाम चालू करण्यापूर्वी शब्द दिला होता.
शेतकऱयांचे अर्धे पैसे देतो असे आश्वासन मिळाले मात्र ते पैसेही दिले नाहीत. उलट शेतकऱयांनाच न्यायालयाच्या नोटीसा बजावल्या आहेत. कारखानदाराने जर चार दिवसात शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर कारखाना प्रशासनास प्रहारस्टाईलने वठणीवर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. आमच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.