
स्थैर्य, फलटण, दि. ०४ : करिअर मध्ये काही गोष्टी एकदाच येतात, ती संधी घेऊन एखादा वेगळा विषय समोर येतो त्यावेळी आपल्या पदाला न्याय देऊन, प्रसंगी चाकोरी बाहेर जाऊन केलेल्या कामाचा निश्चित फायदा होईल याची ग्वाही देत अशा कामातून आपली योग्यता, प्रतिष्ठा, मान सन्मान वाढवा असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तालुक्यातील पोलीस पाटलांना केले.
फलटण तालुका पोलीस पाटील संघाच्या वतीने ५३ व्या पोलीस पाटील दिनाचे निमित्ताने फलटण नगर परिषद सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबीर व वर्धापन दिन अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रांताधिकारी डॉ. जगताप बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत, लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावळ, निवृत्त नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पोलीस पाटील संघाचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप उर्फ कैलास गाढवे पाटील, तालुकाध्यक्ष शांताराम काळेल पाटील यांच्यासह संघाचे अन्य पदाधिकारी आणि सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
प्रशासनातील महसूल मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, बीट अंमलदार, पोलीस पाटील ही मंडळी ग्रामपातळीवर प्रशासनाचे कान, नाक, डोळे म्हणून काम करतात परंतू त्यापैकी केवळ पोलीस पाटील गावात राहणारा आणि संपूर्ण गावाची माहिती असणारा प्रशासनातील महत्वाचा घटक असल्याचे नमूद करीत कोरोना वाढत्या प्रादूर्भावाच्या कालावधीत गावाशी सतत संपर्काची आवश्यकता असताना आपल्यासमोर पोलीस पाटील हा एकच कर्मचारी असल्याचे दिसून आल्यानंतर आपण त्यांना अनेक कामे सांगितली, त्यापैकी अनेक कामे त्यांच्याशी निगडीत नसताना कसलीही तक्रार न करता, आदेशाचा उपमर्द न करता सर्व पोलीस पाटलांनी सर्व कामे बिनचूक केली, प्रसंगी त्यासाठी रात्री अपरात्री बाहेर पडावे लागले मात्र पोलीस पाटील कोठेही कमी पडला नाही हे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी अभिमानाने सांगितले.
प्रशासनात काही मंडळी कामात हलगर्जीपणा करणारी, कामाची टाळाटाळ करणारी असतात त्यातून काम झाले नाही तरी वरिष्ठ पातळीवर त्याची दखल न घेता जाब आम्हा वरिष्ठ अधिकऱ्यांना विचारला जात असल्याने आम्ही कामात बिनचूक व वक्तशीर कर्मचाऱ्यांवर कामाचा थोडा अधिक भार सोपवून कामाची पूर्तता करण्याला प्राधान्य देत असतो, कोरोना कालावधीत नेमके तेच घडले आम्ही पोलीस पाटलांवर एकेक जबाबदारी सोपवीत राहिलो, त्यांनी ती निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडल्याचे नमूद करीत विश्वास संपादन केल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच अतिरिक्त कामातून जबाबदारी बरोबर अधिकार दिले जातात त्याचा फायदा घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले.
‘नॉलेज इज पॉवर’ हे आजच्या जगाचे तंत्र असल्याने अधिक माहिती असणारा व त्याचा योग्य वापर करणारा सर्वश्रुत होत असल्याने चाकोरी बाहेरचे असले तरी त्या कामातून नवी माहिती, नवा अनुभव प्राप्त होत असल्याने कोणतीही जबाबदारी पार पाडताना त्या नव्या जबाबदारीने आपण ज्ञान समृद्ध होणार असाल तर ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले.
कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलांनी उत्तम काम केले, त्यामध्ये महिला पोलीस पाटलांचा सहभागही लक्षणीय असल्याचे नमूद करीत सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीतही आचार संहिता आणि आपले अधिकार याला धरुन उत्तम काम करा असे आवाहन करतानाच कमी वाद विवादात शक्य असेल तर बिनविरोध निवडणूकांसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले.
ग्रामसुरक्षा दल अधिक सक्षम असण्याची आवश्यकता नमूद करीत त्यासाठी तसेच बदलत्या परिस्थितीत सीसीटीव्ही ही सुरक्षेसाठी आवश्यक बाब झाल्याचे नमूद करीत ग्रामपंचायत किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गावात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले.
तहसीलदार समीर यादव यांनी पोलीस पाटील हा सतत गावात राहणारा आणि बदलून न जाणारा एकमेव शासकीय कर्मचारी आहे, त्यामुळे गावासह परिसराची माहिती, लोकांचे प्रश्न, संघर्षाचे विषय वगैरे सर्व गोष्टी त्याला ज्ञात असल्याने तो कायदा सुव्यवस्था परिस्थिती उत्तम प्रकारे नियंत्रणात ठेऊ शकतो म्हणून प्रशासन व पोलीस यंत्रणा या घटकांवर अधिक विसंबून राहते.
प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी यांनी ज्या ज्या सूचना कोरोना काळात पाटलांना दिल्या त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्याचे निदर्शनास आणून देत, कोरोना वाढता प्रादुर्भावाच्या कालावधीत स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची काळजी न करता सर्वच पोलीस पाटलांनी कुटुंब प्रमुख या नात्याने अधिकाऱ्यांच्या सूचनांचा आदर व अंमलबजावणी केल्याचे नंदकुमार भोईटे यांनी स्पष्ट केले.
परगावहुन आलेल्यांची नोंदणी, गरज असेल तर विलगीकरण कक्षात त्यांची व्यवस्था, प्रशासनाच्या सूचना ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे, शासकीय धान्य दुकानातील वितरण सुरळीत करुन सर्व लाभार्थ्यांना त्याचा योग्य लाभ मिळण्याची व्यवस्था, गंभीर रुग्णास तातडीने दवाखान्या पर्यंत पोहोचविणे, समाज प्रबोधन वगैरे सर्व बाबतीत पोलीस पाटलांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे नंदकुमार भोईटे यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रारंभी नेरकर पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आले. तालुकाध्यक्ष शांताराम काळेल पाटील यांनी पोलीस पाटील दिनाविषयी माहिती देतानाच फलटण तालुक्यात पोलीस पाटलांनी गेल्या वर्षभरात काम करताना आपली जबाबदारी आहे, नाही, आपले आरोग्य, कुटुंबाची काळजी या पलीकडे जाऊन कुटुंब प्रमुख म्हणून प्रांताधिकारी व सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन आणि गावाचे हित जपण्याला प्राधान्य दिल्याचे नमूद केले, मात्र शासन/प्रशासनाने अन्य घटकांना विविध सोई, सुविधा, साधने उपलब्ध करुन देताना किंवा आरोग्य विषयक सवलती देताना पोलीस पाटलांचा विचारही केला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. धनाजी नेरकर पाटील यांनी सूत्रसंचालन आणि सौ. रसिका भोसले पाटील यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.