श्री ब्रह्मचैतन्य महाराज व श्री रंगनाथ स्वामी महाराज (निगडी) यांची ३४० वी पुण्यतिथी २५ डिसेंबरला साजरी होते. त्यानिमित्त दोघांनाही साष्टांग प्रणाम. श्री रंगनाथ स्वामी यांचा ही पुण्यतिथी उत्सव निगडी येथे साजरा केला जातो. त्या सत्पुरुषांबाबत थोडी माहिती…
नाझरे ग्रामी जन्म जाहला |
निजांनंदाची कृपा त्याला ॥
अशा पुण्यक्षेत्री श्री रंगनाथ स्वामींचा जन्म झाला. समर्थ पंचायतनातील ते प्रमुख संत होते. श्री समर्थ रामदासांचे लाडके रंगोबा. त्यांनी धर्मजागृतीसाठी जन्म घेतला होता. त्या काळात समाज देश, देव धर्म, संस्कृती विसरला होता. परकीय आक्रमणाने संसारी जीव त्रस्त झाले होते. दुष्काळ, दारिद्य्र, रोगराई, धर्म आचरणाचा अभाव हे सगळे वाढू लागले होते. ‘धर्म’ हाच एक समाजाचे पोषण करू शकतो, याचा लोकांना विसर पडला होता. या काळात समर्थ पंचायतांतील श्री रंगनाथ स्वामी यांनी त्याच्या लेखनाद्वारे, कीर्तनाद्वारे धर्म प्रसार व धर्म रक्षणाचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांना दत्त महाराज कृपेने राजयोग होता. त्यांना तेहरीच्या राजाने अनुग्रह घेतल्यानंतर मनोहर नामक एक पांढरा घोडा व अनेक मूल्यवान गोष्टी त्यांना बहाल केल्या होत्या. पण, रंगनाथ स्वामी हे विरक्तीत रमणारे साधू होते. त्यांचे पट्टशिष्य जनार्धन स्वामी यांचा जन्म, पुतण्या खंडोबाचे रुपांतर शिवलीलामृत लेखक, श्रीधर स्वामी यांच्यामध्ये कसे झाले, घारीचा पुनर्जन्म यासारख्या अनेक कथा आहेत. त्यांच्या अंगी विविध संतत्वाचा या अल्पशा लेखाद्वारे विचार करणे म्हणजे सूर्याला काडवातीने ओवाळण्यासारखे आहे. लग्न करण्याचा घरातील विचार ऐकून ते घर सोडून बद्री, केदार येथे जाऊन तपश्चर्या केली. दत्तकृपा व व्यास आज्ञा यानुसार आनंद संप्रदाय पुढे चालवला. त्यांनी अनेक स्फुट काव्य लिहिली. योगवशिष्ठ, रामजन्म, पंचीकरण, भानुदास चरित्र, गजेंद्र मोक्ष, सुदाम चरित्र, गुरुगीता अशी अनेक ग्रंथसंपदा आपल्या माय मराठी साहित्याला दिली. जेथे घोड्याचे खूर अडकेल तेथे वस्ती करून आपल्या कीर्तनाद्वारे, लेखनाद्वारे धर्म प्रसार व धर्म रक्षण करावे, अशी व्यासज्ञा होती. त्याप्रमाणे कोरेगाव तालुक्यात निगडी येथे खूर अडकला. त्यामुळे श्री रंगनाथ स्वामी येथेच वस्ती करून राहिले. त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचे धाकटे बंधू श्री विठ्ठल स्वामी सपत्नीक राहत होते. त्यांचा वंश गोसावी या आडनावे राहतात. जन्मभूमी नाझरे व समाधीभूमी निगडी दोन्हीकडेही हा उत्सव १० दिवस चालतो. कीर्तन, भजन, प्रवचन याद्वारे धर्मप्रसार केला जातो. गोसावी घरातील लोक ही कीर्तनाद्वारे ही परंपरा चालवतात. निगडी ग्रामस्थ यांची स्वामींवर अलोट अशी श्रद्धा आहे. त्यांच्या सहकार्याने व अनेक भक्तांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा केला जातो.
२५ डिसेंबर, मार्गशीष कृ दशमीला हा उत्सव निगडी येथे होत आहे. त्यासाठी हा लेखनप्रपंच..
- समर्थ पंचायतन :
श्री समर्थ रामदास, सज्जनगड
श्री जयराम स्वामी, स वडगाव
श्री रंगनाथ स्वामी, निगडी
आनंद मूर्ती, ब्रह्मनाळ
केशव स्वामी, भागानगर
सद्गुरुनाथ महाराज की जय
– सौ. श्रुती सचिन गोसावी,
वडूज, जि. सातारा