दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२३ । मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 30 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त मोदी सरकारची विकासकामे, कल्याणकारी योजना मतदारांपर्यंत नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे महा जनसंपर्क अभियान सुरु करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. पुणे येथे भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते बोलत होते. भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मोदी सरकारची अनेक विकास कामे पक्ष संघटनेमार्फत सामान्य माणसापर्यंत पोचवायची आहेत. त्यासाठी बूथ प्रमुखांपासून प्रदेश पदाधिकाऱ्यांनी या अभियानात पूर्ण ताकदीने सहभागी झाले पाहिजे.त्याच बरोबर बूथ सशक्तीकरण अभियान, लाभार्थी संपर्क यासारखे कार्यक्रमही राबविण्यासाठी कार्यसमिती सदस्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, पक्षाची नवी प्रदेश कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली आहे. जिल्हा व मंडल पातळीपर्यंतच्या नियुक्त्या लवकरच पूर्ण होतील. त्याखेरीज राज्यातील सर्व लोकसभा, विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख नियुक्त केले जाणार आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करायची आहे.
त्याआधी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बैठकीला प्रारंभ झाला.