दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशा २१ दिवसांच्या सुमारे २१०० कि. मी. संत नामदेव एकता दौड व रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, हरियाणा मार्गे पंजाब राज्यातील श्री क्षेत्र घुमान अशी काढण्यात येणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली आहे.
भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ व देशभरातील विविध नामदेव समाज संघटनांच्या संयुक्त सहभागाने ‘शांती, समता व बंधुत्व’ हा संदेश देत कार्तिक शुध्द एकादशी म्हणजे गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी या संत नामदेव एकता दौडीचा शुभारंभ संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पंढरपूर येथून करण्यात येणार आहे.
पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिसे यांनी संत नामदेव एकता दौड व रथ यात्रेची माहिती दिली.
भिसे म्हणाले, गतवर्षी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब यामार्गे सायकल यात्रा काढण्यात आली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संत नामदेव महाराजांच्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भक्तगणांनी ही दौड महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, हरियाणा मार्गे पंजाब राज्यातील घुमान या संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीत न्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार हा मार्ग बदलण्यात आला आहे.
संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी उत्तर भारताचा दौरा केला होता. आजच्या विज्ञान युगात त्यांच्या वारकरी सांप्रदायाच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या दौडीचे आयोजन करण्यात आले असून २१ दिवसांची ही दौड श्री क्षेत्र घुमान (पंजाब) येथे मार्गशीर्ष शुध्द १, बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी पोहोचेल.
घुमान येथे दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ही दौड यात्रा परतीच्या प्रवासात मार्गशीर्ष शुध्द एकादशी दिवशी म्हणजे शनिवार, दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. या दौड यात्रेत ज्यांना सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी सूर्यकांत भिसे (वेळापूर) – ९८२२०२३५६४, मनोज मांढरे (पुणे) – ९४२२३०३३४३, अॅड. विलास काटे (आळंदी) – ८७८८४७७०५७, मनोज भांडारकर – ९३७१२०१०१५, सुभाष भांबुरे (फलटण) – ९८२२४१४०३० व राजेश धोकटे – ९४२०४९१४१४ यांच्याकडे अधिक माहिती घेऊन नावनोंदणी करावी, असे आवाहन भिसे यांनी केले आहे.
या बैठकीस नामदेव महाराजांचे १६ वे वंशज ह.भ.प. मुकूंद महाराज नामदास, अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर, महासचिव एस. एस. सोहनी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे, उत्तराखंड अध्यक्ष राकेशकुमार आर्य, हरियाणा अध्यक्ष बलजितसिंग, देवास मध्य प्रदेश रेखा वर्मा, भोपाळ अरुण नामदेव, ओरिसा महेंद्रसिंग दर्जी, चेन्नई कमलेश भराडीया, छत्तीसगढ राकेश परमार, उत्तर प्रदेश सुरेश नामदेव, ग्वाल्हेर जी. टी. नामदेव, राजस्थान मोहनलाल छिपा, पंढरपूर अध्यक्ष गणेश बापू उंडाळे, जळगाव मनोज भांडारकर, पुणे मनोज मांढरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष राजेश धोकटे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.