महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ ताण-तणाव कमी करण्यासाठी संवाद महत्वाचा – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । महसूल विभागात काम करीत असताना नेहमीच ताण-तणावाला सामोरे जावे लागते. ताण-तणाव कमी करण्यासाठी संवाद महत्वाचा आहे, यातून अनेक प्रश्न सुटु शकतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

महसूल दिनानिमित्ताने आयोजित उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणगौरव समारंभ जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी बोलत होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला आदी उपस्थित होते.

कोरोना संकटाच्या काळात महसूल, पोलीस व आरोग्य विभागसह विविध विभागांनी चांगले काम केले. महसूल कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली वागणूक दिली पाहिजे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या संघटना आहेत त्यांच्या काही समस्या असतील त्या थेट मला येवून सांगा. ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्हा शासनाच्या अनेक योजना राबविण्यात देशासह राज्यात अग्रेसर आहे. यापुढेही अग्रेसर राहण्यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी यावेळी सांगितले.

महसूल दिनाच्या शुभेच्छा देवून अपर जिल्हाधिकारी श्रीमती देशमुख म्हणाल्या, अनेक महत्वाच्या विभागापैकी महसूल विभाग शासनाचा महत्वाचा घटक आहे. महसूल विभागात काम करीत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांने स्वत:कडेही लक्ष दिले पाहिजे. सेवा पुस्तकातील नोंदी, पेन्शन केस वेळेत पाठविणे तसेच अनुषंगीक माहिती वेळोवेळी घ्यावी. महसूल विभागात कामाची सुसुत्रता येण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचेही श्रीमती सरदेशमुख यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तलाठी दैनंदिनीचे प्रकाशनही करण्यात आले.

यावेळी उत्कृष्ट अधिकारी, उत्कृष्ट मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, महसूल सहायक, शिपाई, कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी पुरस्कारार्थ्यांनी प्रतिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!