दैनिक स्थैर्य । दि. १० एप्रिल २०२३ । मुंबई । रमजान ईद निमित्ताने ही आनंदाचा शिधा गोरगरीब मुसलमानांना पुरवावे अशी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कडे ईमेल द्वारे लेखी निवेदनाच्या माध्यमातून जोरदार मागणी केली आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे दि. 22 एप्रिल रोजी रमजान ईदचा सण आहे. रमजान महिन्यात सूर्य उगवण्याच्या आधीपासून ते सूर्य मावळे पर्यंत मुसलमान समाज हा उपाशीपोटी व बिन पाणी रोजा अर्थातच उपवास करत असतो. सच्चर कमिटीच्या अहवालानुसार देशातील मुसलमानांची अवस्था ही खूप वाईट आहे. आज देखील शहरी भागात, ग्रामीण भागात मुसलमान समाजाची दयनीय अवस्था आहे. रमजान ईद च्या दिवशी दूध व शेवईचा शीरखुर्मा व गुलगुले केले जातात. तसेच नवीन कपडे घालून ईदची नमाज पठण केली जाते. सर्वधर्मियांच्या सर्वच सणात इतर धर्मीय जनता आनंदाने सहभागी होत असते. हे लक्ष्यात घेता महाराष्ट्र शासनाने ईदसाठीही आनंदाचा शिधा योजनेचा विस्तार करावा. महाराष्ट्राला धार्मिक सलोख्याची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांचा सन्मान करण्याचा आदर्श घालून दिलेला आहे. त्यांचे जतन करून तो वारसा वृद्धिंगत करण्याची महाराष्ट्र शासनाची ऐतिहासिक जबाबदारी आहे. हे लक्ष्यात घेऊन राज्य शासनाने रमजान ईदसाठीही योग्य प्रमाणात आनंदाचा शिधा पुरवण्याचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कडे ईमेल द्वारे लेखी निवेदनाच्या माध्यमातून ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या सुचनेनुसार केली असल्याचे सांगितले.