महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेबांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२१ । मुंबई । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये मानवकल्याणाची ताकद असून या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!