पत्रकार दिनाच्यानिमित्ताने बाळशास्त्रींच्या जन्मभूमीतील कार्यक्रमाला विशेष महत्त्व : बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 07 जानेवारी 2023 | फलटण | “पत्रकार दिनाचे कार्यक्रम राज्यात सर्वत्र होत असतात; पण बाळशास्त्रींच्या जन्मभूमीतील या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी शासकीय कार्यक्रम झालाच पाहिजे यासाठी मी आग्रही आहे”, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी च्या वतीने पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार वितरण समारंभात ना. चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ होते. व्यासपीठावर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ. प्रियांका धावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. चव्हाण पुढे म्हणाले, “पोंभुर्लेत शासकीय कार्यक्रम झाल्यास या कार्यक्रमाची उंची आणखी वाढेल. एकदा प्रशासन आले की, प्रशासनामुळे समृद्धी येते. यातून गावाचा विकास होईल. बाळशास्त्रींच्या नावे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांना फार मोठी प्रतिष्ठा आहे. समाजामधील अडचणींना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात. राज्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली आहे. जांभेकरांसारख्या व्यक्ती आजही समाजमनावर राज्य करत असतात. त्यांचे मुंबईत स्मारक व्हावे या रवींद्र बेडकेहाळ यांच्या मागणीच्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठकीचे निश्चितपणे आयोजन करू. तसेच इथून पुढे प्रत्येक पत्रकार दिनाला आपण पोंभुर्ले येथे उपस्थित राहू”, असेही ना. चव्हाण यांनी सांगितले.

“आयोध्या राम मंदिरावरून जन्मभूमीला किती महत्त्व असते हे सिद्ध झाले आहे. बाळशास्त्रींचे समग्र दर्शन व्हावे या उद्देशाने आम्ही त्यांच्या जन्मभूमीत या स्मारकाची उभारणी केली आहे. या महापुरुषाची महती लक्षात घेऊन पोंभुर्ले गावचा विकास व्हावा व कर्मभूमी मुंबईत त्यांचे स्मारक व्हावे”, अशी अपेक्षा रवींद्र बेडकीहाळ यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केली.

यावेळी डॉ जगदीश कदम, कैलास म्हापदी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी बाळशास्त्रींच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ३१ व्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांचे वितरण ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सम्पन्न झाले. यामध्ये राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार डॉ.सागर देशपांडे (पुणे), कैलास म्हापदी (ठाणे), श्रीकांत कात्रे (सातारा), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार – सौ.कृतिका पालव (मुंबई), साहित्यिक गौरव पुरस्कार – डॉ.भगवान अंजनीकर (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार – शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता.फलटण), विक्रम चोरमले (फलटण) यांचा समावेश होता.

मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, रोहित वाकडे, अरुण खरात यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विश्वस्त अमर शेंडे यांनी मानले.

कार्यक्रमास जिल्हा महिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पोंभुर्ले गावचे उपसरपंच सादिक डोंगरकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!