
स्थैर्य, सातारा, दि.23 ऑक्टोबर : आली माझ्या घरी ही दिवाळी, लक्षदीप हे उजळले घरी या व अशा सदाबहार हिंदी – मराठी गीतांनी आज सातारकरांची दिवाळीची पहाट कलावंतांनी मंगलमय केली. कुरणेश्वर येथे पर्यावरण रक्षणासाठी लावलेले जनजागृतीचे फलक तरुणाईचे लक्ष वेधून घेत होते.
कुरणेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या माध्यमातून कुरणेश्वर गणपती मंदिर परिसरात ‘दिवाळी पहाट’ हा हिंदी – मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात झाला होता. ‘गितबाहर ’चे हृदयनाथ गायकवाड, अनिल कांबळे, रोहिणी शितोळे, सौ. जावळे आणि त्यांच्या सहकार्यांनी अवीट गोडीची भक्तिपर गीते, भावगीते सादर केली. ‘हरित सातारा’चे उमेश खंडुझोडे, डॉ. खुशी जोशी, किरण कदम, निलिमा कदम, मुख्याध्यापिका प्रशाली विसापुरे, सौ. खंडुझोडे आदी कार्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती केली.
समर्थ शिक्षक परिषदेचे संस्थापक सुधीर विसापुरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजी महाडिक यांनी सायकल देत असल्याचे जाहीर केले. ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक अरुण गोडबोले यांच्या स्मरणार्थ कुरणेश्वर रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जकातवाडीचे माजी उप सरपंच चंद्रकांत सणस, माजी नगरसेवक विजय काटवटे, कुरणेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपचे शिवाजी क्षीरसागर, ड. संदीप संकपाळ, शंकर सकटे, प्रकाश बडदरे व सातारकर नागरिक उपस्थित होते.

