स्थैर्य, सातारा, दि. ०५ : सातारा जिल्ह्यात आज बुधवारी जिल्हा प्रशासनाने 144 कलम लागू केल्यामुळे रामजन्मभूमी मंदिराचा निर्माण कार्य व भूमिपूजन कार्यक्रम घरोघरी आरती, भजन ,पूजन व प्रार्थनेने करण्यात आला. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील विविध राममंदिरात तसेच अनेक मंदिरांमध्ये त्या मंदिराचे पुजारी व मान्यवर विश्वस्तांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी आरती, पूजन व राम नामाचा जयघोष करण्यात आला.
सातारा शहरातील काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, राम मंदिर शहा ,राम मंदिर तसेच सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थांच्या समाधी मंदिरात, श्री क्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात, गोंदवले येथील थोरले राम मंदिरात ,फलटण येथील नाईक-निंबाळकर यांच्या भव्य श्रीराम मंदिरात, फलटण तालुक्यातील गिरवी येथील देशपांडे राम मंदिर, कराड येथील राम मंदिर याठिकाणी विशेष पूजाअर्चा करण्यात आली .तसेच सामाजिक अंतर राखून साधेपणाने हा भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी साखर, पेढे वाटप करणे, गुलाल उधळणे, फटाके वाजवणे याला मनाई असल्यामुळे असे कृत्य कोणीही केले नाही .मात्र घरोघरी अनेकांनी श्री राम, जय श्री राम, नाम धुन ,राम रक्षा स्तोत्र ,भीमरूपी स्तोत्र आदींचे पठण करत श्रीरामाची पंचारतींनी आरती करून घरातील व्यक्तींना मिठाई व साखरेने तोंड गोड करून आनंद केला. घरोघरी अयोध्या येथे संपन्न झालेला भूमिपूजन सोहळा अनेकांनी दूरदर्शन वर पाहत आपुलकीने आपल्या डोळ्यात साठवत या कार्यक्रमाचे आपण औचित्य साधले याबद्दल धन्यता मानली.