दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२३ । कोल्हापूर । करवीर तालुक्यात नंदवाळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर असून हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आज आषाढी एकादशी निमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नंदवाळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. व शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ देत, चांगला पाऊस पडू दे… असे साकडे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी त्यांनी घातले.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत नरके, करवीर उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे, नंदवाळ सरपंच अमर कुंभार, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कामत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, प्रति पंढरपूर नंदवाळ श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष विश्वास पाटील, व्यवस्थापक भीमराव पाटील, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनी आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचे नामस्मरण करत नंदवाळला जाणाऱ्या पालखी, वारकरी, ग्रामस्थांची भेटी घेतल्या. विठूरायाचे नामस्मरण करत पंचक्रोशीतील भजनी मंडळे, वारकरी, दिंड्या यांच्या स्वागतासाठी सेवा देणाऱ्या अनेक सेवेकऱ्यांनी सेवा म्हणून प्रसादाचे वाटप स्टॉल्सलाही भेटी दिल्या. आषाढी एकादशीनिमित्त सर्व भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर पासून 14 किलोमीटर राधानगरी रोडवर वाशी गावाजवळ असलेल्या नंदवाळला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निजस्थान असून ते दररोज मुक्कामासाठी, वास्तव्यासाठी विठ्ठल, राई (सत्यभामा), रखुमाई नंदवाळेमध्येच असतात. या तीनही स्वयंभू मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण हेमाडपंथी मंदिर अनेक दशकांपूर्वीचे आहे.
पुईखडी येथे ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांप्रमाणेच गोल रिंगण सोहळा पार पडला. हजारो भाविकांच्या सुरक्षा व वाहतूक सुरळित पार पाडण्याकरिता कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व शहर वाहतूक विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.