भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दि. १० ते २३ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । फलटण । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दि. १० ते २३ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची व विचारांची भव्य शोभा यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात येणार असल्याचे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने प्रतिवर्षी विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात येतात, तथापी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ वर्षात जयंती महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, यावर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने शासनाने निर्बंध शिथील केले असल्याने यावर्षी जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ॲड. अनिकेत अहिवळे यांनी निदर्शनास आणून दिले.

उद्या बुधवार दि. १३ रोजी रात्री १२ वाजता डॉ. आंबेडकर चौक येथे आंबेडकरी नूतन वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे सांगून गुरुवार दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता जिंती नाका, फलटण येथे भी स्वागत करण्यात येणार असून सायंकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ, फलटण येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व विचारांची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात येणार असल्याचे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी निदर्शनास आणून दिले.

जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेले सर्व कार्यक्रम उपक्रम शांतता व शिस्तीने झाले पाहिजेत, विशेषत: शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात येणारी भव्य मिरवणूक शिस्तबद्ध व शांततेत पार पाडण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी शांतता व शिस्त पालन समिती स्थापन करण्यात आल्याचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आमदार दिपक राव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थान काळात फलटण येथे आले असताना शहरातील शेरी नावाच्या भागात त्यांनी प्रजा परिषद घेतली होती, त्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी दि. २३ एप्रिल रोजी त्या जागेवर प्रजा परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून यावर्षी दि. २३ एप्रिल रोजी भिमस्फुर्ती भूमी, मंगळवार पेठ, फलटण येथे सायंकाळी ६ वाजता आंबेडकरी प्रजा परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी सांगितले.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी कार्याध्यक्ष केतन शांतीलाल सोरटे, सचिव सुशांत देवडत्त अहिवळे, उपाध्यक्ष ज्ञानरत्न महादेव अहिवळे, प्रतिक अशोक गायकवाड, कुणाल किशोर काकडे, खजिनदार गौतम अरुण अहिवळे, सहसचिव सुशांत दिवाकर काकडे, उपसचिव अक्षय विनायक काकडे, संघटक उमेश ज्ञानेश्वर काकडे, उप संघटक निखिल किरण अहिवळे, सहसंघटक अंश तथा अभि काकडे यांची ओळख करुन देत संपूर्ण समिती सदस्य पदवीधर असल्याचे निदर्शनास आणून दिले.


Back to top button
Don`t copy text!