दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । सातारा । स्वराज्य संस्थांच्या स्वनिधीमधील पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणसाठी राखीव ठेवण्यात येतो. त्यानुसार या संस्थांनी हा निधी राखीव ठेवला होता व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना त्या निधीचे वाटप ही करण्यात येणार होते, मात्र समाज कल्याण विभागाच्यावतीने सबंधित प्रशासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर दिव्यांगांना देण्यात येणारा निधी रोखला असल्याने दिव्यांग मध्ये नाराजी पसरली आहे.
जिल्हा समाजकल्याण विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना वीस दिवसांपूर्वी संबंधित दिव्यांग कल्याण निधी खर्च न करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात म्हटले आहे की नगरपालिका नगरपंचायती नगरपरिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वनिधीमधून पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी राखीव ठेवण्यात येतो. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी नगरपरिषद नगरपंचायत नगरपरिषदा दिव्यांग निधी मधून आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींचा सर्वे करण्याचे नियोजन करण्यात आले असल्या कारणाने सदर निधी नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका स्तरावरून इतर बाबींवर पुढील आदेशापर्यंत खर्च करण्यात येवू नये असे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या सहीने पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हंटले आहे.
दरम्यान कराड नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सुमारे साडेतीनशे दिव्यांग बांधव दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग निधीकडे डोळे लावून बसले असताना ऐन दिवाळीच्या तोंडावरच जिल्हा प्रशासनाने हा दिव्यांग कल्याण निधी रोखल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. नगरपरिषद महिला बालकल्याण विभागाने याची सर्व तयारी केली असताना प्रशासनाकडून आलेल्या आदेशामुळे त्यांचीही कोंडी झाली आहे.