स्थैर्य, मुंबई, दि. ०५: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी उद्या दिनांक ६ मे रोजी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्राचे नामवंत इतिहास संशोधक, इतिहासकार व समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार हे ‘छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर ४२ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला १ मे रोजी ६१ वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने परिचय केंद्राने १९ मार्च २०२१ पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु केली आहे. या व्याख्यानमालेत ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार आपले विचार मांडणार आहेत.
डॉ. जयसिंगराव पवार यांच्याविषयी
आघाडीचे इतिहासकार म्हणुन डॉ. जयसिंगराव पवार यांची देश-विदेशात ओळख आहे. डॉ. पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जीवनचरित्र देशभर पोहोचविण्याचे कार्य तर केलेच आहे. परदेशातही शाहू महाराजांचे जीवनचरित्राचा प्रसार करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. डॉ. पवार यांनी आतापर्यंत ४० संशोधनात्मक ग्रंथ व ४५ शोधनिबंध लिहीले आहेत. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापन त्यांनी १९९१ ला केली आहे. या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र इतिहास प्रबोधनी या महत्त्वपूर्ण संस्थेची त्यांनी १९९२ ला स्थापना केली. या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. डॉ. पवार हे शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याचे मानद संचालकही आहेत.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी इतिहासातील कर्तबगार महापुरूष, स्वातंत्र्य चळवळीतील निवडक व्यक्तीमत्वांवर ग्रंथ लिहीले आहेत. यामध्ये शिवचरित्र-एक मागोवा, शिवचरित्रापासून काय शिकावे? , छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, शिवपुत्र छत्रपती राजाराम, स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाई, मराठयांचे स्वातंत्र्ययुद्ध, मराठेशाहीचे अंतरंग, मराठी साम्राज्याचा उदयास्त, क्रांतिसिंह नाना पाटील, आमच्या इतिहासाचा शोध व बोध, राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ या ग्रंथांचे लिखाण करून समृद्ध वैचारिक वारसा त्यांनी निर्माण केला आहे.
डॉ. पवार यांना त्यांच्या इतिहास लिखाण्याच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिजामाता विद्वत-गौरव पुरस्कार, महर्षी विठठल रामजी शिंदे पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, मालोजीराजे लिंबाळकर पुरस्कार, फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, सेनापती प्रतापराव गुजर पुरस्कार, गुरूवर्य शामराव देसाई पुरस्कार, सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.
यासह महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सवानिमित्त शाहू-चरित्रकार म्हणून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मराठी, हिंदी, व इंग्लिश शाहू चरित्राचे प्रकाशन व सन्मान, माजी राष्ट्रपती प्रणव मुखजी यांच्या हस्ते इंग्रजी भाषेतील शाहू चरित्राचे प्रकाशन व सन्मान, शिवपुत्र छत्रपती राजाराम या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा इतिहासाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार व सन्मान, प्राप्त झाला आहे.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
गुरूवार दि. 6 मे 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राच्या खालील लिंक वर थेट प्रसारित होईल.