
दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑक्टोबर २०२२ । फलटण । येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने फलटण ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायीवारी पालखी सोहळ्याचे आयोजन केले असून शनिवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता पालखी रथाचे प्रस्थान अहिल्यादेवी नगर, गजानन चौक येथून होणार असल्याची माहिती, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय चोरमले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.
पालखी सोहळ्यााबाबत सविस्तर माहिती देताना संजय चोरमले यांनी सांगितले की, या पायीवारी पालखी सोहळ्याची सुरुवात फलटणमधून नगरप्रदक्षिणेने होणार असून दि.29 रोजी सकाळी 7:45 वाजता रथाचे पुजन होऊन रथ प्रस्थान गजानन चौक – बुधवार पेठ श्री स्वामी समर्थ मंदिर – शंकर मार्केट – श्रीराम मंदिर – गजानन चौक – उमाजी नाईक चौक – एस.टी. स्टँड मार्गे हा सोहळा अक्कलकोटकडे रवाना होईल. तरी या पायीवारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चोरमले यांनी केले आहे.
११ दिवसांचा सोहळा
सदरचा पायीवारी पालखी सोहळा ११ दिवस चालणार असून सोहळ्यादरम्यान दि.२९ रोजी वाजेगाव, दि.३० रोजी नातेपुते, दि.३१ रोजी माळशिरस, दि.१ नोव्हेंबर रोजी जाधववस्ती तोंडले, दि.२ रोजी पंढरपूर, दि.३ रोजी सुस्ते, दि.४ रोजी कुरूल, दि.५ रोजी बेलाटी देगांव, दि.६ रोजी कुंभारी, दि.७ रोजी ब्यागेहळ्ळी फाटा असा प्रवास करुन दि.८ रोजी सोहळा अक्कलकोट येथे पोचणार आहे.