शनिवार दि. १६ पासून फलटण तालुक्यात कोविड लसीकरण सुरु : पहिल्या फेरीत आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण : डॉ. आर. एम. जगदाळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. १३ : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम शनिवार दि. १६ जानेवारी पासून फलटण तालुक्यात सुरु होत असून आरोग्य केंद्र, तरडगाव आणि नागरी आरोग्य सेवा केंद्र, शंकर मार्केट, फलटण येथे पहिल्या फेरीत २०१३ जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील १० जणांना लसीकरण प्रशिक्षण जिल्हास्तरावर देण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एम. जगदाळे यांनी सांगितले.
       पहिल्या फेरीत आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असून ज्यांना लसीकरण करावयाचे आहे त्यांना आदल्या दिवशी कोणत्या केंद्रावर, किती वाजता लसीकरण करावयाचे आहे त्याबाबत एस.एम.एस. द्वारे सूचना देण्यात येणार आहे. दिलेल्या सूचनेप्रमाणे वेळेत व केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे, दुसऱ्या दिवशी लसीकरण करता येणार नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एम. जगदाळे यांनी कळविले आहे.
  शासनाने सर्व प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन घेण्याची संधी दिल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पहिल्या फेरीत तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, खाजगी वैद्यकीय व्यवसाईक व त्यांच्या रुग्णालयात काम करणारे कर्मचारी यांना कोविड लसीकरण दोन डोस मध्ये करण्यात येणार आहे, दोन डोस मधील अंतर ४ आठवड्यांचे राहणार असल्याचे नमूद करीत कोविड ॲपद्वारे या सर्वांची नोंदणी करण्यात आली असल्याचे डॉ. आर. एम. जगदाळे यांनी सांगितले.
    १० दिवसांच्या पहिल्या फेरीत तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, खाजगी वैद्यकीय व्यवसाईक व त्यांचे कर्मचारी यांचे लसीकरण पहिला डोस पूर्ण करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून देत दुसऱ्या फेरीत  पोलीस व फ्रंट लाईन कर्मचारी यांना जवळचे प्रा. आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य सेवा केंद्र, फलटण येथे कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या सर्वांनी आपली वैयक्तिक माहिती कोविड ॲप मध्ये नोंदणी करण्यासाठी फोटो आयडीसह जवळच्या प्रा. आरोग्य केंद्रात संपर्क करुन तेथे नोंदणी करुन घेणे आवश्यक असल्याचे नमूद करीत नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना एक दिवस अगोदर लसीकरणाची तारीख, वेळ, ठिकाण त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर कळविण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!