दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । फलटण । महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय मराठी साहित्य संमेलन सोमवार दि. २१ व २२ मार्च फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित केले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांची निवड झाली आहे. तसेच नियोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व ज्येष्ठ कथाकार भारत सासणे व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव प्रसिद्ध कवियत्री व चित्रकार मीनाक्षी पाटील संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप भोसले व जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय मराठी साहित्य संमेलन सोमवार दि. २१ व २२ मार्च रोजी फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी सद्गुरू पतसंस्था येथे पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. त्यावेळी सद्गुरू उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीप भोसले व जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष प्रा. शांताराम आवटे, कार्याध्यक्ष ताराचंद आवळे, कार्यवाह अमर शेंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्य संमेलन दि. २१ मार्च रोजी सकाळी १० वाजून ३० मि. ते दुपारी १ वाजून ३० मि. ते या वेळेत होणार असून विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तर मराठी भाषा राज्यमंत्री ना. डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या संमेलनाचे संयोजक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी व जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फलटण शाखेचे अध्यक्ष प्रा. शांताराम आवटे आहेत.
दि. २१ मार्चच्या उद्दघाटन समारंभात महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विशेष योगदाना बद्दल महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांना यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह अनेक मालिकांचे प्रसिद्ध पटकथा, कथा लेखक प्रताप गंगावणे यांना यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी, जयंत येलुरकर व प्रकाश होळकर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रवींद्र बेडकिहाळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल विनोद कुलकर्णी व प्रमोद आडकर यांचे विशेष सत्कार यावेळी संपन्न होणार आहेत.
मुलीच्या लग्नात पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ रुपये एक लाखांची पुस्तके रुखवतात भेट देणारे जयवंत तांबे व सायकलवरून पंचवीस हजार किलोमीटर प्रवास करून गावोगावी शाळा वाचनालय यांना आतापर्यंत दहा हजार पुस्तके देणगी म्हणून देणारे जीवन इंगळे या दोघांचा वाचन संस्कृतीला बळ दिल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट को. ऑप. फेडरेशनवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल दिलीप भोसले व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन सूर्यवंशी – बेडके यांना अंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाल्या बद्दल या विशेष सत्कार करण्यात येणार आहेत.
संमेलनातील अन्य कार्यक्रम या प्रमाणे दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजून ३० मि. आजची प्रसार माध्यमे व साहित्यिक सद्यस्थितीत समाज प्रबोधनात कमी पडत आहेत, या विषयावर परिसंवाद आयोजित केलेला आहे.