कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने २० हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२३ | सातारा | भारतीय समाज आज खूप विकसित झाला आहे. मात्र, तरी देखील मासिक पाळी आणि त्या काळा दरम्यानची स्वच्छता यांविषयी अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर ग्रामीण, दुर्गम भागातील महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने जवळपास २० हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे ग्रामीण भागातील महिलांना वाटप करण्यात आले आहे.

कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा व फक्त महिला डॉक्टरांचा समावेश असणार ‘ग्लॅम डॉक’ चॅरिटी फॅशन शो आयोजित केला जाणार आहे. या चॅरिटी फॅशन शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात आज एकाच दिवसात 20 हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. यामध्ये पुण्यातील गणेशखिंड रोड येथील खैरेवाडी परिसर तसेच सातारा जिल्ह्यातील परळी, लावघर, आबेवाडी, गोळेवाडी या गावांमध्ये या सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. यावेळी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार, डॉ.राजश्री ठोके, डॉ. श्रद्धा जवंजाळ, डॉ. राहुल जवंजाळ, डॉ. स्नेहल जगताप, डॉ. रेश्मा मिरगे, डॉ. प्रज्ञा भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यावेळी बोलताना म्हणाले, ग्रामीण तसेच शहरी भागातही बहुतांश कुटूंबात आजही मासिक पाळी विषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे या काळातील महिलांची शारीरीक व मानसिक स्थिती समजून घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता यांविषयी जनजागृती करण्याची काळाची गरज आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात मनिषा गाडे निशा आनंद लोहार, जुईली जितेंद्र लोहार, वैशाली लोहार, दीपाली संतोष लोहार, आनंदी लोहार यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने या सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!