दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | बारामती |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘माझी माती, माझा देश’, ‘मातीस प्रणाम, वीरांना वंदन’ हे अभियान बारामती नगर परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
यानिमित्ताने शारदा प्रांगण येथे शीलाफलक अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजारोहण, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि पंचप्रण शपथ देण्यात आली. त्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात बारामती तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक व आजी-माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, कमल कोकरे, आशा माने, नीलिमा मलगुंडे, वनिता बनकर, संतोष जगताप, सूरज सातव व मुख्याधिकारी महेश रोकडे आणि जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष निलेश कोठारी व नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे उत्तराधिकारी आणि आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सन्मान झाल्याने खर्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्याचे समाधान होत असल्याबद्दल स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिक यांनी नगरपरिषद प्रशासन यांचे कौतुक केले.
देशासाठी बलिदान व योगदान देणार्यांचा सन्मान करणे ही भारतीय संस्कृती असून त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.
त्याग, बलिदान, योगदानाची परंपरा पुढील पिढीलासुद्धा माहीत होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिक यांचा सन्मान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त करण्याचे भाग्य नगरपरिषदेला मिळाले, त्यामुळे यापुढेही मोठ्या जोमाने कार्य करू, असेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगून उपस्थित यांना पंचप्रण शपथ दिली.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिक यांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल सावळे-पाटील यांनी केले व आभार संतोष तोडकर यांनी मानले.