रवी पवार यांचा इशारा; गोळीबारमधील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
स्थैर्य, सातारा, दि. ०४ : गेल्या अनेक दिवसांपासून गोळीबार मैदान, रामराव पवार नगर या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही वन विभाग लक्ष देत नाही. वॅन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा येत्या १५ ऑगस्टला वॅन विभागाच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन- तीन वर्षांपासून रामराव पवार नगर, गोळीबार मैदान, अजिंक्यतारा लागतच डोंगर, दक्षिण दरवाजा या भागात बिबट्याचा वावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या नागरी वस्तीत दिसू लागला आहे.या बिबट्याने अनेक कुत्री फस्त केली आहेत. बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे त्याच भागात असंख्य लोक दररोज फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉक साठी जात असतात. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वॅन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेकदा तोंडी, लेखी कळवूनही वन विभाग गांभीर्याने घेत नाही. तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात वन विभागाने सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरु करावी अन्यथा जनहितासाठी वन विभागाच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी त्यांच्याच कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करू, असा इशारा रवी पवार यांनी दिला आहे.