
दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । फलटण । गेली पाच वर्ष यशस्वीरित्या धैर्य सामाजिक संस्था चालविणारे आणि गोफणचे राष्ट्रीय खेळाडू असलेले ओंकार उतेकर यांची निवड भारतीय गोफणफेक फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी करण्यात आली आहे.
गोफण हा ऐतिहासिक वारसा असलेला आणि भारतात पुरातन काळापासून चालत आलेला शस्त्र प्रकार आहे. गोफनीचा वापर हा शिवरायांच्या काळापासून युद्धात केला जात असे त्याच बरोबर शेतीचे संरक्षण करण्यासाठी देखील गोफण या शास्त्राचा वापर शेतकरी करत असत.
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांना याच गोफनीच्या सहाय्याने सळो की पळो केले होते. अशी ऐतिहासिक पाश्वभूमी असलेल्या शस्त्र कलेला भारतभर खेळाचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी, भारतीय क्रिडा प्रकारात गोफण खेळाचा समावेश व्हावा आणि जागतिक खेळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी भारतीय गोफणफेक महासंघ म्हणजेच स्टोन स्लिंग थ्रो फेडरेशन ही क्रिडा संस्था सातत्याने कार्य करत आहे.
शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक म्हणून आजपर्यंत त्यांनी केलेली कामगिरी, संस्था चालविण्याचा अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि उत्तम खेळाडू अशा गुणांना पारखून गोफणफेक फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्षपद ओंकार उतेकर यांना देण्यात आल्याची माहिती फेडरेशनच्या संस्थापिका रागिणी अमराळे यांनी दिली.
पुणे शहरात गोफणफेक महासंघचे मुख्य कार्यालय आहे. संपूर्ण भारतातून कित्येक प्रशिक्षणार्थी गोफणचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत या खेळाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. या पारंपारिक कलेचा क्रिडा स्वरूपात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फेडरेशन मार्फत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात राज्यस्तरीय गोफण प्रशिक्षण शिबिराचे डिसेंबर महिन्यात आयोजन करण्यात आले होते.