फलटण शहरात ओमीक्रॉनची भिती; युगांडावरुन आलेले ते चौघे कोव्हीड पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । फलटण । पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या युगांडा देशातून चार जण फलटण शहरात आले आहेत. फलटणला आल्यानंतर या चार जणांची कोरोना चाचणी झाल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, त्यांना ओमीक्रॉन आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी प्रशासनाने पुढील पाऊले उचलली आहेत. या चौघांचेही जनुकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याबाबतच्या दक्षता घेण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय आढावा घेण्यासाठी इन्सीडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी आज एका बैठकीचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये रविवारी ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेहून आलेला नागपूर येथील ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 18 इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपामध्ये एक, कल्याण डोंबिवली 1 आणि नागपूरमध्ये एक असे रुग्ण आढळले आहेत. 18 पैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. नऊ रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात एक नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. फलटणला आलेल्या या प्रवाशांचे देखील सर्वेक्षण झाले असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी आता अत्यंत काळजीपूर्वक शहरात वावरणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.


Back to top button
Don`t copy text!