अधिकाऱ्यांनो कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : श्रीमंत विश्वजितराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अधिकारी वर्ग सहकार्य करताना दिसून येत नाही. आगामी काळामध्ये सर्वसामान्य शेतकरी, शेतकऱ्यांचे पाल्य व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर कोणत्याही अधिकाऱ्याबाबतीत कसलीही तक्रार आली तरी त्यावर कडक पावले उचलण्यात येतील. आपल्या कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम पंचायत समितीचे नूतन सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

फलटण पंचायत समितीत पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा नूतन सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी घेतला. त्यावेळी श्रीमंत विश्वजितराजे बोलत होते. यावेळी नूतन उपसभापती संजय सोडमिसे, सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे, सौ. रेश्मा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या नियुक्त ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित रहावे. आपल्या नियुक्त ठिकाणी जर उपस्थित राहता आले नाही, तर आपल्या वरिष्ठाना त्याबाबत पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत कोणीही जर आपल्या नियुक्त ठिकाणी नागरिकांना भेटत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आगामी काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध राहणार आहे, असेही श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत. त्या योजना संबंधित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे वितरण करण्यात येणार आहे. ज्यांना आगामी योजनेचा लाभ घ्यायचा आहे परंतु त्यांना प्रक्रिया माहित नाही त्यांना सुद्धा त्यांच्या गावामध्ये येऊनच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाच शासकीय काम हे संबंधित गावामध्येच पूर्ण करण्यावर आमचा सर्वांचा मानस आहे, असेही श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यामधील बहुतांश ग्रामसेवक हे नियुक्त ठिकाणी बसत नाहीत. ग्रामपंचायतीमध्ये सांगतात कि “अण्णा फलटणला गेले आहेत” वास्तविक ते फलटणला सुद्धा कामासाठी आलेले नसतात. आगामी काळामध्ये अश्या प्रकारे जर कोणी ग्रामसेवक कामकाज करीत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!