तृप्ती सोनवणे यांचा अधिकार्‍यांनी आदर्श घ्यावा : विक्रमसिंह पाटणकर


स्थैर्य, पाटण, दि. १९ : अधिकारी कर्तव्यदक्ष असला की कायदा व सुव्यवस्था अबाधित तर रहातेच याशिवाय समाजही त्यांना डोक्यावर घेतो. याचे आदर्श उदाहरण पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दाखवून दिले आहे. येणार्‍या अधिकार्‍यांनीही असाच आदर्श कारभार पुढे चालवावा. पाटणच्या पुण्यभूमीत केलेल्या कार्या दरम्यान मिळालेली पदोन्नती निश्‍चितच भविष्यातील सार्वत्रिक वाटचाल सुखकर करेल, अशा शुभेच्छा राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दिल्या.

पाटण पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. तृप्ती सोनवणे यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली व पाटणहून नागपूर येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना विक्रमसिंह पाटणकर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर यांची उपस्थिती होती.

यावेळी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, सौ. सोनवणे यांनी केवळ एका वर्षात येथे केलेल्या प्रामाणिक सेवेचे निश्‍चितच कौतुक केले पाहिजे. याच काळात अतिवृष्टी, महापूर, लोकसभा, विधानसभा निवडणूक, कोरोना पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन, जमावबंदी, संचारबंदी, नाकाबंदी आदी नैसर्गिक, कृत्रिम आपत्तीमध्येही धडाडीने काम केले. एका बाजूला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवलीच याशिवाय स्थानिक जनतेच्या मनात आपले वेगळेपण सिद्ध केले. यामुळेच आज त्यांचा प्रत्येक स्तरातून पदोन्नतीसाठी सत्कार व बदलीसाठी हळहळ व्यक्त होत आहे.

तृप्ती सोनवणे यांनी याबाबत आभार व्यक्त करत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे आशीर्वाद घेतले. पाटणकर परिवार व सर्व संस्था, कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेवतीने तृप्ती सोनवणे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!