दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । आटपाडी । अनुदान तत्वावर मान्यता असणाऱ्या 24 नोव्हेंबर, 2001 पूर्वीच्या महाराष्ट्रातील 78 महाविद्यालयातील प्राध्यापकांना 21 वर्षापासून पगार नसल्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उपासमार होत आहे. यासाठी अनेक वेळा आंदोलने व आमरण उपोषणे केल्यामुळे त्यांचा हा प्रश्न शासनाच्या दरबारी चव्हाट्यावर येऊन शासनाने या सर्व महाविद्यालयाचे तीन वेळा मूल्यांकन ही केले आहे, मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे उच्च शिक्षण मंत्रालयाकडून अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव तयार होऊन, अर्थ मंत्रालयाकडे जातो व तेथून तो फेटाळण्यात येतो. अशी परिस्थिती पाठीमागील चार वर्षापासून शासन पातळीवर सुरू आहे. यामुळे सदर महाविद्यालयात अध्यापनाचे कामकाज करणारे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबांची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जगणे, शिक्षण घेणे, व मुला- मुलींचे विवाह करणे कठीण झाले आहे. तरी अशा महाविद्यालयातील सर्व महाविद्यालयांना अनुदान देऊन त्यांची एकवीस वर्षापासून चाललेली दुरावस्था दूर करावी, अशी नम्र विनंती करण्यासाठी कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खानापूर विधानसभेचे आमदार, मा. अनिलभाऊ बाबर यांच्याकडे साकडे घातले . त्यांच्या पुढे ठाओ फोडून विनंती करण्यात आली की. “अनिल भाऊ, आपण यामध्ये लक्ष घालून महाराष्ट्रातील या सर्व महाविद्यालयाचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा व सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ” मा. अनिलभाऊ बाबर यांनी , “मी आपल्या अनुदानाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून निश्चितपणे तो सोडवतो, असे आश्वासन दिले.
या संदर्भात कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी मधील प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे, प्रा. डॉ. बाळासाहेब कदम व प्रा. भारती देशमुखे यांनी विटा येथे जाऊन आमदार, अनिलभाऊ बाबर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व कळकळीची विनंती केली.