फलटणमध्ये फटाका स्टॉलच्या परवान्यासाठी २५ ऑक्टोबर अंतिम मुदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
दीपावली उत्सव दि. २९ ऑक्टोबर २०२४ पासून अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त लागणार्‍या फटाक्यांची विक्री करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. फलटण तालुक्यामध्ये असा तात्पुरता फटाका स्टॉल परवाना देताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तसेच फलटण शहर/ग्रामीण/लोणंद ता. खंडाळा मधील पोलीस निरीक्षक यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार फलटण यांचेमार्फत विहीत अटी-शर्ती घालून असा परवाना दिला जातो.

फलटण शहरामध्ये नगरपालिकेकडून ठरवून दिल्याप्रमाणे तसेच ग्रामीण भागामध्ये संबंधित ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेमध्येच फटाका विक्री करणे बंधनकारक असून सदर स्टॉलमध्ये अग्निशमन प्रतिबंधक साहित्य ठेवणे बंधनकारक आहे. तसेच असा कोणताही परवाना न घेणारे फटाका स्टॉल अथवा निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त अन्यत्र व्यवसाय करणारे अथवा विहीत अटी-शर्तीचे पालन न करणार्‍या स्टॉलधारक हे संबधित पोलीस स्टेशनमार्फत कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र आणि अन्य परिपूर्ण कागदपत्रांसह फटाका स्टॉलसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ असून या दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा अथवा या दिनांकापूर्वी त्रुटी पूर्तता न करणार्‍या अर्जाचा परवान्यासाठी विचार केला जाणार नाही, असे आवाहन फलटण तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.

तहसील कार्यालय फलटण यांचेमार्फत सर्व संबधितांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्व इच्छुकांनी विहीत मुदतीत अर्ज करुन परवाना प्राप्त करून घ्यावा तसेच असा परवाना दिल्यानंतर दिलेल्या परवान्यातील सर्व अटी-शर्तीचे कटाक्षाने पालन करावे तसेच आपल्या दिलेल्या परवान्याची प्रत ही आपल्या दुकानात सर्वांना दिसेल अशा प्रकारे लावावी आणि अग्नीशमन यंत्रेदेखील दुकानात उपलब्ध ठेवावीत.

कोणत्याही व्यक्तीने रितसर परवाना घेतलेशिवाय अथवा ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी फटाके विक्री केलेस सदर फटाके जप्त करून त्याचे दुकान सील करून त्याचेवर गुन्हा नोंद करणेत येईल. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन फटाके फोडावेत. त्याबरोबरच महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ याची आचारसंहिता सर्वत्र लागू असलेने त्याचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता देखील सर्व स्टॉलधारक व नागरिकांनी घ्यावी. असे आवाहनदेखील तहसिल कार्यालय फलटण यांचेतर्फे करणेत आले आहे.

फलटण शहर हददीत तात्पुरता फटाका स्टॉल परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे –
१) फटाका परवाना मिळणेबाबत अर्ज
२) ५०० रुपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र अटी/शर्ती बाबत
३) नगरपालिका नाहरकत दाखला
४) आधारकार्ड स्वंयसाक्षाकित प्रत
५) रक्कम रु.६००/- चे चलन

फलटण ग्रामीण हद्दीत लागणारी कागदपत्रे –
१) फटाका परवाना मिळणेबाबत अर्ज
२) ग्रामपंचायत ना हरकत दाखला
३) जागेचा उतारा
४) ५०० रुपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र अटी / शर्ती बाबत
५) आधारकार्ड स्वसाक्षाकिंत प्रत
६) रक्कम रु. ६००/- चे चलन


Back to top button
Don`t copy text!