स्थैर्य, रेठरे बुद्रुक, दि.४: सध्या भात काढणी हंगाम सुरू आहे. मात्र, पावसामुळे काढणीत व्यत्यय येत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. अशा संकटात मजूरही शेतकऱ्यांना कात्रीत पकडू लागले आहेत. भात काढणीसाठी मजूर मजुरीसह वरखर्चासाठी काही रक्कम मागू लागले आहेत.
पाणी साचणाऱ्या शेतांमध्ये भात पीक शेतकरी घेतात. यातून उत्पन्न चांगले मिळते. मात्र, मशागतीच्या कामाबरोबर भात रोपांची लागण करण्यासाठी मजुरांचा खर्च अधिक होतो. रोप लागणीमुळे उत्पादन वाढते. यामुळे पेरणीपेक्षा लागणीचे क्षेत्र अधिक राहिल्याने मजूर शेतकऱ्यांना कोंडीत पकडून त्यांच्याकडून जादा मजुरी खर्च घेतात. एकतर एक किंवा पाच मजुरांकडून कामे पूर्ण होत नाहीत. अशा वेळी गटाने असलेल्या मजुरांच्या पुट्यास काम देणे सोपे ठरते. मात्र, पुट्यातील मजूर अशावेळी शेतकऱ्यांकडून अडवून खर्च घेतात. हिच पद्धत पुढे भात काढणीच्या हंगामावेळी राबवली जात आहे.
काढणीचे काम जोखमीचे राहते. या कामासाठी गोपाळ समाजातील मजूर अग्रभागी असतात. ते मजूरसुद्धा शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. त्यांच्याकडून एकरी मजुरीरुपी प्रति 22 पायली वजनाची सहा पोती भात घेतले जातात. वैयक्तिक मजूर प्रतिव्यक्ती तीन ते चार पायलीप्रमाणे रोजंदारी घेतात. एकतर पावसाने काही शेतातील पिके काढणीयोग्य असताना उभी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तोच मजुरांचा तुटवडा व उपलब्ध मजुरांच्या फाजील मागण्यांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव ते मागतील तो खर्च द्यावा लागत आहे.
दारू अन् मांसाहारी भोजनाचीही मागणी
पुट्यांद्वारे काढणी करणे एकरी शेतकऱ्यांना सुलभ होते. मात्र, काही गुंठ्यांतील शेतकऱ्यांना हा खर्च पेलत नाही. खर्चाबरोबरच मजूर शेतकऱ्यांकडून वरखर्चही उकळत आहेत. चहापानासाठी 500 ते एक हजार रुपयांची वरदक्षिणा मागितली जात आहे, तर काही मजूर दारू आणि मांसाहारी जेवणाची मागणी करत आहेत.