प्रशासनातर्फे डिस्कळ गाव पुर्णतः सील
स्थैर्य, खटाव, दि. १८ : डिस्कळ ता. खटाव येथील 60 व 40 वर्षीय दोघेही करोना बाधीत सापडल्याने खटाव तालुक्यातील लोकसंख्यने मोठे असलेल्या डिस्कळ गावासह सह उत्तर खटाव भागातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. प्रशासनातर्फे डिस्कळ गाव पुर्णतः सील करण्यात आले आहे.गेल्या महिन्याभरापासून या गावाच्या आसपास करोना रुग्ण सापडत होते आता मात्र याच गावातील दोन व्यक्ती करोना बाधित झाल्या असल्याने नागरिकांच्या भीती निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी एका नातेवाईकांच्या पुणे येथील लग्नासाठी डिस्कळ येथील एका कुटुंबातील चार पाच जण दि 30 जून रोजी सकाळी गेले व संध्याकाळी घरी परत आले, मात्र त्यांना कोरोन्टीन करण्यात आले नाही. दरम्यान दि 14 जुलै रोजी त्याच्या कुटुंबातील 60 व40वर्षीय व्यक्तीला सर्दी,ताप, खोकला व धाप लागत असल्याची लक्षणे दिसून येत असल्याने त्या दोघांना मायणी येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले, आज सकाळी 11 वाजता त्या दोघांचा कोविड पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.त्या कुटुंबातील इतर 13 व्यक्तीना हायरिस्क म्हणून पुसेगाव कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी या गावाच्या आसपासच्या खेडय़ात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते मात्र आज मोठय़ा बाजारपेठेच्या डिस्कळ मध्ये करोना पॉझिटिव्ह सापडल्याने येथील ग्रामस्तांमध्ये खळबळ उडाली आहे. परिसारातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लोकांनी कोरोनाला सहज न घेता दैनंदिन व्यवहारात व सार्वजनिक ठिकाणी आरोग्याच्या सुरक्षीतेसाठी दक्ष रहाणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. दरम्यान डिस्कळ येथे नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ युनूस शेख ग्रामपंचायत पदाधिकारी ,मंडलाधिकारी, तलाठी, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके ,डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ एम एम पवार,डॉ रणदिवे यांनी येथे जावून पूर्ण डिस्कळ गाव कन्टोन्मेंट झोन जाहीर केले आहे त्यामुळे येथील नागरिकांना 14 दिवस घराबाहेर पडता येणार नाही. . आशा, अंगणवाडी सेविका व गावाच्या दक्षता पथक यांची 20 पथके तयार करण्यात आली असून घरोघरी जावून कुटूंबाच्या आरोग्याचा सर्वे केला जाणार आहे.