इच्छुकांसह कार्यकर्त्यांना पालिका निवडणूकीचे वेध; दोन्ही प्रमुख गटाचे कार्यकर्ते सक्रीय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 26 सप्टेंबर 2021 । फलटण । फलटण नगरपालिकेच्या निवडणूकीचा कालावधी जवळ येत असून या निवडणूकीच्या निमित्ताने शहरातील नेते मंडळींसह कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. फलटण नगरपरिषदेवर सन 1991 पासुन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली राजे गटाची सत्ता आहे. गत दोन वर्षापूर्वी म्हणजेच सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत माढा मतदारसंघाच्या खासदारपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाल्यापासून त्यांच्या माध्यमातून शहरात भारतीय जनता पार्टी व पर्यायाने खासदार गट चांगलाच सक्रीय झाला आहे. त्यामुळे एकीकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली यंदाच्या निवडणूकीत नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी खासदार गटाचे कार्यकर्तेही कामाला लागलेले आहेत. तर दुसरीकडे खासदार गटाचे तगडे आव्हान पलटवून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी राजे गटातील कार्यकर्तेसुध्दा निवडणूकीचे आराखडे आखण्यात व्यस्त झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार वार्ड पद्धती रद्द करून पुन्हा प्रभाग पद्धतीनेच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेनुसार निवडणूक लढवण्याचा आवाका नसणार्‍या गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काहींनी आत्ताच माघार घेतल्यात जमा आहे. तर नगरपरिषदेची निवडणूक निर्धारित वेळेतच होईल असा कयास बांधुन कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला भावी नगरसेवक मानणार्‍या अनेकांची रेलचेल आता शहरात दिसु लागली आहे.

पालिकेच्या निवडणूकीचे वेध लागल्यानंतर अनेक इच्छुकांनी वरिष्ठांकडून निवडणूकीच्या तिकीटाचा शब्द मिळवण्यासाठी गतवर्षापासुनच मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. लॉकडाउन शिथिल होताच राज्य निवडणूक आयोगानेही राज्यात विविध ठिकाणी होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल प्रशासन प्रभाग रचना संदर्भातील पाहणी पुर्ण करून कच्चा आराखडा तयार करीत आहेत. हा आराखडा तयार झाल्यावर लवकरच निवडणूक आयोग मतदार यादी व प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करेल. या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्याने राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. इच्छुकांनी तर प्रभागातील लोकांच्या याद्याच तयार करून राजकीय गणित कसे जुळविता येईल याचे मनसुबे आखण्यास सुरवात देखील केली आहे.

राज्याच्या शिवसेना – राष्ट्रवादी – राष्ट्रीय काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. गत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक आमदारांची निवडणूक या तीनही पक्षांनी एकत्रित लढवली होती. त्यात त्यांना यशही मिळाले होते. तर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक एकत्रित लढूनही त्यात भाजपने त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपाला थोपवण्यासाठी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रितपणे लढवण्याचा जर वरिष्ठ पातळीवरुन निर्णय झाला तर फलटण नगरपरिषद, फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांची गणितं कशी जुळणार ? हा प्रश्‍न महाविकास आघाडीमधील पक्ष कार्यकर्त्यांना पडत आहे. आणि जर सर्वच पक्ष स्वतंत्र लढले तर राष्ट्रवादी (राजे गट) विरुद्ध भाजप (खासदार गट) अशीच तगडी फाईट पालिका निवडणूकीच्या रणांगणात होणार, असेही अंदाज बांधले जात आहेत.


Back to top button
Don`t copy text!