दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । मुंबई । उसाचा रस, सरबत किंवा ज्युस पिण्यापुर्वी त्यात घातलेला बर्फ खाद्य असल्याची खात्री नक्की करा. खाद्य बर्फ रंगहीन असतो, तर अखाद्य बर्फाचा रंग निळसर असला पाहिजे, असे बंधन कायद्याने उत्पादकांवर घातले आहे. त्यांची काटेकोर अमंलबजावणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्राशासनाच्या सहायक आयुक्त श्रीमती अ.अ. भोईटे यांनी केले आहे.
उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर शीतपेये, उसाचा रस, सरबत, लस्सी, बर्फ गोळा, नीरा, ताक, ज्युस, आइस्क्रीम, अशांची मागणी वाढते. या पदार्थांमध्ये बर्फाचा वापर होतो. ज्युस पिण्यापुर्वी त्यात घातलेला बर्फ खाद्य असल्याची खात्री नक्की करा. खाद्य बर्फ रंगहीन असतो, तर अखाद्य बर्फाचा रंग निळसर असला पाहिजे, असे बंधन कायद्याने उत्पादकांवर घातले आहे. त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहिम 15 जुन पर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेदरम्यान त्यांच्या अन्न पदार्थांचे नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्राशासनाच्या सहायक आयुक्त श्रीमती अ.अ. भोईटे यांनी सांगितले.
प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व निर्मळ अन्न उपलब्ध होण्यासाठी, तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. त्यामुळे खाद्य बर्फ हा परवानाधारक किंवा नोंदणीधारक व्यवसायिकांकडून खरेदी करावा. नागरिकांनी वरील पदार्थांचे सेवन करताना त्याकडे खाद्य बर्फ असल्याची खात्री करावी, असे आवाहनही श्रीमती भोईटे यांनी केले.