
स्थैर्य, 17 फेब्रुवारी, सातारा : कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे प्रशासकीय इमारत प्रांगण, पारंगे चौक, एस टी स्टँण्ड पाठीमागे सातारा येथे शुक्रवार दि. 20 व शनिवार दि. 21 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते होणार आहे.
या महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाणांचे धान्य त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती, परभणी मोती, फुले रेवती व फुले सूचित्रा परळी खोन्यातील देशी नाचणी, तांदूळ, जावळीची नाचणी, मान व खटावची बाजरी, मूग व ज्वारी उपलब्ध होणार आहेत. कडधान्यांमध्ये जात्यावर दळलेली मुग, उडीद, काळ्या घेवड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रीस उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सातारा जिल्ह्यात उत्पादित झालेली व उच्च कुरकुमिन असलेली वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ त्यामध्ये विविध प्रकारच्या, नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू, नाचणी अंबिल तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कोरेगावचा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, खंडाळा येथील देशी बाजरी, कन्हाडची नाचणी, जावळी, पाटणचा देशी इंद्रायणी तांदूळ, फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळांचा आस्वाद घेता येणार आहे.
या पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये थेट शेतकर्यांच्या शेतातून ताजे व स्वच्छ अन्नधान्य, व दर्जेदार फळाच्या खरेदीचा लाभ जिल्हयातील ग्राहकांनी घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

