दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । सोलापूर । डाळींब, केळी, द्राक्ष बागांसाठी लाखोंचा खर्च करूनही पिकांवरील वेगवेगळ्या आजारांमुळे ऐनवेळी पीक हातून निसटते. पिकांना हमीभावदेखील समाधानकारक मिळत नाही. राबणूक कमी अन् खर्चही मोजकाच आणि हमखास उत्पन्न, त्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात सोलापूर जिल्हा अव्वल आहे.
राज्यातील ऊस क्षेत्रात दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली आहे. मागील गाळप हंगामाने तर रेकॉर्ड ब्रेक केला. आतापर्यंतच्या साखर कारखानदारीच्या इतिहासात तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा तो हंगाम झाला. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’च्या माध्यमातून तेवढी रक्कम मिळाली. कोणत्याही फवारणीशिवाय, रोगांशिवाय हे पिक येत असल्याने फळबागांच्या तुलनेत त्याचा खर्चही खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढला आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये ऊस आहे, पण अमरावती, अकोला, वाशिम, रत्नागिरी, चंद्रपूर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात २०२० पूर्वी दरवर्षी सरासरी १५ ते २० शेतकरी आत्महत्या व्हायच्या. पण, मागील २० महिन्यांत केवळ आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रशासनाकडे नोंद आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २० महिन्यांत दोन, पुणे जिल्ह्यात एक, सांगलीतील नऊ, साताऱ्यात तीन आणि यंदा लातूर जिल्ह्यात ३६, जालन्यात ६७, परभणीत ४४ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. पण, या जिल्ह्यातील सध्याच्या शेतकरी आत्महत्यांच्या तुलनेत २०१९ व २०२० ची आकडेवारी अधिक होती. उसाची शेती करणाऱ्यांच्या तुलनेत अन्य पिके घेणारे शेतकरी आत्महत्यांमध्ये जास्त आहेत.
१७० दिवस चालणार गाळप हंगाम
राज्यातील ३१ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक उसाचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात दोन लाख ३१ हजार हेक्टर इतके आहे. उजनी धरणामुळे जिल्ह्यातील हरितक्रांतीला गती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर (१,७५,५६० हेक्टर), नगर (१.६० लाख हेक्टर), पुणे (१,५७,५७० हेक्टर), सांगली (१,३७,५८५ हेक्टर), सातारा (११६,६२५ हेक्टर) यासह औरंगाबाद, परभणी, जालना, लातूर, उस्मानाबाद व बीड या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी ४० हजार ते ८५ हजार हेक्टरपर्यंत ऊस आहे. दरम्यान, दररोज आठ लाख टन उसाचे गाळप होईल, एवढी कारखान्यांची गाळप क्षमता आहे. त्यामुळे वेळेत सर्व उसाचे गाळप व्हावे म्हणून आगामी हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु केला जाणार आहे. त्यासंदर्भांत मंत्रिसमिती पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेईल.
राज्यातील गाळप हंगामाची स्थिती
एकूण क्षेत्र
१४.८९ लाख हेक्टर
गाळपासाठी कारखाने
२०४
साखर उत्पादन
१३८ लाख मे.टन
हंगामाचा कालावधी
१७० दिवस