स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : सोनिया गांधी यांच्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तत्पूर्वी काँग्रेसमधील 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपआपले म्हणणै मांडले. त्यात नेतृत्व संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा. पक्षातील मरगळ दूर करावी आणि संपूर्ण काँग्रेसच्या रचनेत बदल करण्याचा सूर निघाला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपची वाट धरणे आणि सचिन पायलट यांचे बंड यामुळे काँग्रेसच्या तरुण पिढीला सोनिया गांधी यांचे नेतृत्व मान्य नाही का, असा सूर मागील काही दिवसांपासून उमटत आहे. त्यामुळे कार्यकारिणीच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. पक्षातील काही तरुण नेत्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी जोर लावून धरली तर ज्येष्ठ आणि जुन्या नेत्यांकडून मात्र सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा असावी, अशी मागणी केली जाणार आहे. त्यामुळे भावी अध्यक्ष राहुल गांधी की सोनिया गांधी यावर सोमवारी मंथन होणार आहे. परंतु राहुल गांधी यांनी नकार दिला तर गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणते नाव पुढे येईल याकडेही लक्ष लागले आहे.
सोनिया गांधींचे त्या पत्रांना उत्तर
काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम व जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली असून, सोनिया गांधी यांनी पत्राला उत्तर दिले आहे. पक्षाध्यक्षपद सोडायला आपण तयार असून एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा, असे त्यांनी नेत्यांना म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या
● नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत
● CWC च्या निवडणुका घेतल्या जाव्यात
● पक्षाची हरवलेली शक्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी धोरण आखण्यात यावे
● संघटनेच्या प्रत्येक स्तरावर निवडणुका व्हाव्यात
● संसदीय पक्ष मंडळाची निर्मिती व्हावी
● प्रदेश काँग्रेस समित्यांना अधिकार द्यावेत