दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२४ | फलटण |
फलटण शहरातील रस्त्यांवरील चौकात गोंधळ घालत वाढदिवस साजरा करणे आता महागात पडणार असल्याचे २२ जून रोजी फलटण शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. यापुढे शहरातील चौकांमध्ये वाढदिवस साजरा करणार्यांवर शहर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
याबाबत माहिती अशी, दि. २२ जून २०२४ रोजी रात्री ११.०० वाजता पिरॅमिड चौक, फलटण येथे सुभान आझम जिरायत (वय २२ वर्षे, राहणार तेली गल्ली, फलटण) याचा वाढदिवस असल्याने सुभान जिरायत याच्यासह पाच मुले शांतताभंग करताना आढळल्याने या सर्वांवर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पाचजणांमध्ये यश शहाजी चव्हाण (वय २२ वर्ष, रा. बिरदेव नगर, फलटण), ऋषिकेश दीपक थोरात (वय २३ वर्ष, पवार गल्ली, फलटण), उमेर तन्वीर शेख (वय २२ वर्ष, रा. कसबा पेठ, फलटण), ओम तुषार पवार (वय २२ वर्ष, रा. पवार गल्ली, फलटण) व हर्षवर्धन विश्वकर्मा निकम (वय २२ वर्षे, रा. बुधवार पेठ, फलटण) यांचा समावेश आहे.
ही कारवाई फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक आर. एस. फाळके यांनी केली.
तरुणांनी वाढदिवस साजरा करताना स्वत:ला आवर घालावा, चौकात गोंधळ घालून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा पोलीस प्रशासन कारवाई करणार, असा इशाराही फलटण शहर पोलिसांनी दिला आहे.
चौकात वाढदिवस साजरे करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम जसे की, वृद्धाश्रमात व मतिमंद मुलांच्या शाळेत अन्नदान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून आपला वाढदिवस स्मरणात राहील, परोपकारी राहील, शांततेत आनंददायी होईल हे पाहावे.