स्थैर्य, सातारा, दि. २६ : मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. आजवरच्या मैदानावरच्या लढाईत बहुसंख्येने मोठ्या असलेल्या मराठा समाजानेच यश मिळविले आहे. आता न्यायालयीन लढाई ही मराठा यशस्वी होतील. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या वतीने आपली बाजू मांडणारे वकील ॲड प्रशांत केंजळे हे सातारा जिल्ह्यातीलच आहे त्याचा अभिमान आहे असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज व साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार श्री. छ .उदयनराजे भोसले यांनी काढले.
सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शनिवारी जलमंदिर पॅलेस येते एडवोकेट प्रशांत केंजळे, जे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची बाजू मांडत आहेत त्यांचा सत्कार उदयनराजे यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाज बहुसंख्य आहे. राजकारणातही मराठा समाजातील आमदारांची संख्या मोठी आहे. तरीही इतकी वर्षे मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिला आणि यासाठी राज्यकर्तेच जबाबदार आहेत .मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मानसिकताच राज्यकर्त्यांमध्ये नव्हती .त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. जेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतरला त्यावेळी महामोर्चे निघाले आणि सर्वच राजकीय पक्षांना जाग आली .मराठा समाजाने आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मैदानावरची लढाई अतिशय त्वेषाने आणि निकराने लढली यासाठीही आम्ही अनेकदा समाजासोबत रस्त्यावर उतरलो. सभा, मेळावे, परिषदा घेतल्या आता ही लढाई न्यायालयीन पातळीवर सुरू आहे. त्यात सुदैवाने सर्वोच्च न्यायालयात आपल्या सातारा जिल्ह्याचे प्रशांत केंजळे मराठा समाजाची बाजू मांडत आहेत. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी मराठा समाजाची बाजू कोर्टात भक्कम पणे मांडावी.आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील. आम्ही ही कायमच त्यांना मार्गदर्शन करत राहू असेही उदयनराजे म्हणाले.
या वेळी सत्काराला उत्तर देताना अडवोकेट प्रशांत केंजळे म्हणाले की, समाजाचा आर्थिक स्तर व समाजाचे प्रश्न याची जाणीव व निश्चित आम्हाला आहे .मराठा समाजाची बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी मी सुप्रीम कोर्टात उभा आहे आणि याचा मला विशेष अभिमान आहे .यावेळी कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, मोर्चाचे समन्वयक शरद काटकर, जीवन चव्हाण आदी उपस्थित होते.