दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑक्टोबर 2021 । फलटण । फलटण शहरामधील वाहतुकीस शिस्त लागण्यासाठी फलटण नगरपरिषदेच्या वतीने क्रेन खरेदी करण्यात आलेली आहे. फलटण शहरासह तालुक्यामधील नागरिक हे काही ना काही कामानिमित्त फलटण शहरामध्ये रोज येत असतात. फलटण शहरामधील क्रांतिसिन्ह नाना पाटील चौक, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, कै. अशोकराव भोईटे चौक (डेक्कन चौक) या परिसरासह फलटण शहरामध्ये सर्वत्रच दुचाकी व चारचाकी गाड्या ह्या मोठ्या प्रमाणावर पार्किंग होत आहेत. त्यामुळे फलटण शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या साठी फलटण नगरपरिषदेने क्रेनची खरेदी केली असून फलटण शहरामधील वाहतूक व गर्दी नियंत्रण करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. सदरील क्रेनचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या वेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, किशोर नाईक निंबाळकर, सनी अहिवळे, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. प्रगती कापसे, सौ. दीपाली निंबाळकर, सौ. वैशाली अहिवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आगामी काही दिवसामध्ये विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका, पोलीस व महसूल प्रशासनाची संयुक्त बैठक बोलावून क्रेनच्या वापराबाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे.