आता बोर्ड परीक्षेत नापास होणे कठीण तर पास होणे फार सोपे : उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
अंतर्गत मार्कस्मुळे आता बोर्ड परीक्षेत नापास होणे कठीण तर पास होणे फार सोपे आहे, असे प्रतिपादन जिल्हा उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी केले.

फलटण एज्युकेश सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे ३० जानेवारी रोजी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी रविंद्र खंदारे यांनी मुधोजी हायस्कूलमधील इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम मुधोजी हायस्कूलच्या चित्रकला हॉलमध्ये पार पडला.

यावेळी बोलताना उपशिक्षणाधिकारी खंदारे म्हणाले की, येणार्‍या १२ वीच्या बोर्ड परीक्षेसाठी सामोरे जाताना कोणतीही भीती किंवा न्यूनगंड न बाळगता, न घाबरता सामोरे गेले पाहिजे. आताच्या घडीला बोर्ड परीक्षेत नापास होणे कठीण आहे तर पास होणे फार सोपे आहे. कारण तुम्हाला अंतर्गत मार्कस्मुळे पास होणे सोपे झाले आहे. अभ्यास करताना मनाची एकाग्रता म्हत्त्वाची आहे. त्यासाठी ध्यान धारणा करणे म्हत्त्वाचे आहे. त्याबरोबर अभ्यासाचे नियोजन फार म्हत्त्वाचे आहे. हे सर्व करून स्वतःमधील क्षमता ओळखा व या परीक्षेस न भीता न डगमगता सामोरे जा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी.एम. गंगवणे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर आपण यश संपादन करू शकतो. योग्य नियोजन ही यशाची गुरुकिल्ली आहे. ती मिळविण्यासाठी कष्टाची तयारी हवी, त्यावेळी यश चालून आल्याशिवाय राहाणार नाही, असे सांगितले.

कार्यक्रमासाठी मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एम. के. फडतरे, माध्यमिकचे उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, पर्यवेक्षक शिवाजीराव काळे, ज्युनिअर कॉलेजचे शिक्षकवृंद इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

सूत्रसंचालन एस. एम. पवार यांनी केले तर आभार उपप्राचार्य ए. वाय. ननावरे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!