आता देणे फक्त निसर्गाचे.. आणि चवणेश्वरचा पायथा डोलू लागला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दोन दिवसांपूर्वी (५ जून) जागतिक पर्यावरण दिन संपन्न झाला. त्याच दिवशी दुपारी माझे मित्र श्री. रतन धुमाळ यांचा फोन आला आणि मी एक छोटेसे फार्म हाऊस बांधले आहे तुम्ही पाहण्यासाठी या असे आग्रहपूर्वक सांगितले. बोलता बोलता रतन म्हणाले, फार्म हाऊस महत्वाचे नाही, तुम्हाला निसर्ग खूप प्रिय आहे तुम्ही या, हे ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल.

रतन धुमाळ यांचे गाव सोनके. कोरेगाव तालुक्याच्या अगदी उत्तर टोकाला. तसा हा भाग अवर्षणप्रवण क्षेत्रातील. येथे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष. परिसरातील जवळपास सर्वच गावात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करुन पावसाचा थेंब थेंब मुरवण्याचा व साठवण्याचा प्रयत्न येथील लोक करीत आहेत. सोनके गावातही अशी काही कामे झाली आहेत. तरीही शेतीला पाणी जेमतेमच आहे.  रतन धुमाळ यांचे कुटुंब एक प्रतिथयश कुटुंब आहे. सामाजिक व राजकीय कुटुंब म्हणून केवळ सोनके गावातील नव्हे तर कोरेगाव तालुक्यातील नामांकित कुटूंब म्हणून सर्वपरिचित आहे. गावांत असलेला अत्यंत आकर्षक दगडी वाडा हे या कुटुंबांचे घरही खूप प्रसिद्ध आहे. मोठी सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी या कुटुंबाला आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून या कुटुंबाचा आणि माझा स्नेह आहे. रतन हे या कुटुंबातील उच्च विद्याविभूषीत तरुण. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. लहानपणापासून रतन यांना सामाजिक कार्याची ओढ होती आणि राजकारण तर घरातूनच शिकायला मिळाले. त्यामुळे मोठय़ा कंपनीत, मोठ्या हुद्द्यावर असूनही रतन गावाकडील कार्यक्रमात सतत सक्रिय राहिले. पण राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला त्यांनी जास्त प्राधान्य दिले. आमच्यातील घट्ट मैत्रीचे कदाचित तेही एक कारण असेल.

बर्‍यापैकी दुष्काळी असलेल्या या भागात रतनने नेमके काय केले असावे या उत्सुकतेने मी सोनक्याला पोहोचलो. सोबत मा. बाबासाहेब कदम आणि माझे मित्र, प्रसिद्ध मृदंगवादक संदीप जाधव होते. वाड्यासमोर गर्दी होती. कोरोना वायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या, डाॅक्टरांनी सुचवलेल्या शक्तीवर्धक अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप तेथे सुरु होते. रतनच्या पुढाकारातूनच हा कार्यक्रम चालू होता. आम्ही गाडीतून उतरलो नाही, रतन आमच्या सोबत बसले आणि आम्ही थेट फार्म हाऊसकडे निघालो. करंजखोप मार्गे चवणेश्वरकडे चला असे रतन म्हटल्यावर थोडे आश्चर्य वाटले. कारण तो परिसर म्हणजे पाण्याची मोठी टंचाई असलेला प्रदेश. आम्ही करंजखोप ओलांडून पुढे गेलो. हळूहळू हिरवे शिवार संपून सभोवती कोरडवाहू जमीन दिसू लागली. समोरच चवणेश्वरचा डोंगर दिसत होता. आम्ही अगदी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो आणि अचानक समोर हिरवागार पट्टा नजरेस पडला. रानावनात शोभेल असे तेथे बांधलेले सुंदर घर बर्‍यापैकी उंचावर बांधले असल्यामुळे लगेच नजरेत भरत होते. गेटवर मोठी दगडी फरशी बसवली होती. त्यावर कोरलेली अक्षरे होती ‘सुरेशराव धुमाळ फार्म हाऊस’. आम्ही गाडीतून उतरलो आणि आवाक होऊनच अवती भवती पहात राहिलो.

शिवारात आजूबाजूला दगड धोंडे आणि पाने नसलेले वृक्ष. येथे मात्र हिरवागार शालू पांघरलेली जमीन आणि अत्यंत तजेलदार पानांफुलांनी लगडलेली छोटी छोटी झाडे. मन अगदी प्रसन्न होऊन गेले. ही किमया कशी केली असा प्रश्न रतनला विचारल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि मग पुढचे दोन तास आम्ही ऐकत व पाहात राहीलो. रतनचे शब्द मनात आणि नव्याने बहरत असलेली सृष्टी नजरेत साठवण्याचा प्रयत्न आम्ही करीत होतो. एकाच वेळी निसर्गाची दोन रुपं आम्ही पहात होतो. या जागेला लागूनच वन विभागाची हद्द सुरु होते. उजाड, मोकळी टेकडी, मागे चवणेश्वरचा डोंगर. डोंगरातून आलेला पाण्याचा एक ओढा या जमीनीतून पुढे जातो. पूर्वी ही जमीनही उघडी बोडकी व दगड धोंड्यांनी व्यापलेली. या जागेत मुळची पाच सहा मोठी झाडे आहेत. दोन जांभळाची, दोन कडूलिंबाची, एक उंबर आणि एक आंबा. या झाडांना सुरक्षित ठेवत जमीनचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली. रतन सांगत होते. मोठ मोठे दगड काढून उताराच्या बाजूला लावून त्यावर मातीची भर टाकली. ओढ्याचे रुंदीकरण केले व ओढा पुर्वीपेक्षा खोलही केला. वन विभागाच्या हद्दीत वनाधिकार्‍यांच्या संमतीने लूजबोल्डर व सिमेंट नालाबांध बांधले. या जमीनीच्या हद्दीत एक सिमेंट बंधारा व मोठे तळे तयार केले. डोंगरातून येणारे पाणी वेगाने पुढे जाणार नाही किंबहुना येथेच जमीनीत मुरेल अशी व्यवस्था केली. मग योग्य जागा बघून विंधन विहिर (बोअर वेल) काढली. सुदैवाने चांगले पाणी लागले आणि मग कामाचा उत्साह वाढला.

आत्तापर्यंत आपण निसर्गाकडून खूप काही ओरबडून घेतले. आपल्या सुखासाठी पर्यावरणाचा र्‍हास होतोय याची कधी फिकीर केली नाही. सुदैवाने आज आमच्याकडे खूप काही आहे. कुटुंबाबरोबरच सामाजिक बांधिलकीतून समाजासाठीही खूप काही केले. आता मात्र निसर्गाची परतफेड करण्यासाठी करायचे. निसर्ग जपायचा, वाढवायचा आणि प्रसंगी *आता देणे फक्त निसर्गाचे या भूमिकेतून जगायचे.* जे काही करायचे ते फक्त निसर्गासाठी. रतनच्या बोलण्यातून निसर्गावरचे निस्सीम प्रेम व्यक्त होत होते. पर्यावरण दिनाच्या दिवशी आलेला रतनचा फोन आत्ता माझ्या अंतकरणाचा ठाव घेत होता.

आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या पाचशे पेक्षा जास्त वृक्षांची लागवड येथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व झाडांना ठिबक सिंचनने पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. एकही झाड मरणार नाही याची काळजी घेतली जाते.

रतनने केवळ आपल्या मालकीच्या जागेत झाडे लावली नाहीत तर आजूबाजूच्या मोकळ्या जागेत, चवणेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला व अगदी वन विभागाच्या हद्दीतील टेकडीवरही स्वतः झाडे लावली आहेत. प्रत्येक झाडापर्यंत ठिबक सिंचन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू वन विभागाच्या हद्दीतील उंचावरच्या झाडांना ठिबकचे पाणी जात नाही. त्या झाडांना रोज डोक्यावरूनपाणी घातले जाते. सध्या लाॅकडाऊनमुळे रतन यांचे सर्व कुटुंबिय गावीच असल्यामुळे ते सर्वजण दररोज बादलीने या झाडांना पाणी घालतात. गेल्या दोन महिन्यांत ही झाडे चांगलीच तरारली आहेत. इतरवेळीही या झाडांना पाणी घातले जाईल याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरन, वड, पिंपळ, लिंब, आंबा जांभळ, चिंच असे डेरेदार वृक्ष व जोडीला गुलमोहर, चाफा, सोनचाफा, बोगनवेल इत्यादी फुलांची मोठी झाडे लावण्यात आली आहेत. आवळ्याचीही लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. स्थानिक निसर्गाशी एकरुप होणारी विविध प्रकारची अनेक छोटी फुलझाडे लावण्यात आली आहेत.

आंब्याच्या लागवडी बाबत माहिती देताना रतन सांगत होते की, हापूस कलमे लावण्यापेक्षा मुद्दामहून आम्ही साधी, आपल्याकडची देशी आंब्याची लागवड जास्त केली आहे. कारण हे आंब्याचे झाड डेरेदार होते, भरपूर सावली मिळेल आणि ते पुढे शंभर दिडशे वर्षे टिकेल. चवणेश्वरकडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना सावली होईल आणि फळेही खाता येतील. अलिकडे सर्वच लोक हापूस आंबा लावतात त्यामुळे ही आपली परंपरागत आंब्याची झाडे दुर्मिळ होत चालली आहेत. म्हणून आम्ही परिसरात या आंब्याची शंभरपेक्षा जास्त झाडे लावली आहेत.

येथे लावलेली सर्व झाडे आता तीन चार फुटांच्या वर पोहोचली आहेत. या परिसरातील घाणेरी (मसराड) सारख्या खुरट्या, काटेरी जाळ्या, आणि करवंदाची झुडपे जाणीवपूर्वक जतन करण्यात आली आहेत. रंगबिरंगी फुलपाखरे या झुडपांवर मुक्तपणे संचार करताना दिसत होती.  काही दिवसांपूर्वी उजाड दिसणारा चवणेश्वरचा पायथा या ठिकाणी बहरलेला दिसू लागला आहे. या वृक्षांच्यारुपाने तो डोलू लागला आहे. काही दिवसातच फळाफुलांनी डवरलेला आणि पक्षांच्या लक्ष थव्यांनी गजबलेला हा चवणेश्वरचा पायथा निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरेल यात शंका नाही.

निसर्गाच्या सान्निध्यात दोन तीन तास मनमुराद आनंद घेतल्यानंतर आम्ही तेथून निघालो. पण *’आता देणे फक्त निसर्गाचे…’* हे रतन धुमाळ या माझ्या निसर्गप्रेमी मित्राचे शब्द अजूनही कानात रुंजी घालत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनात कायमचे कोरुण ठेवावेत असेच ते शब्द आहेत. आता प्रत्येकाने निसर्गाचे देणे त्याला सव्याज परत देण्याची वेळ आलेली आहे. रतनच्या कुटुंबाने सुरुवात केलेय. त्यांचे कौतुक कोणत्या शब्दात करायचे ? पण नकोच, शब्दांच्या परिभाषेत न मावणारी ती उदात्त भावना आहे. तो भाव आपण समजून घेण्यातच त्यांचा आनंद सामावला आहे असे मला वाटते.

राजेंद्र आनंदराव शेलार, भिवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा

8999247187

9923406777

[email protected]


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!