स्थैर्य, पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर आणि इतर एकाला गुन्हे शाखा युनिट 4 च्या अधिकार्यांनी अटक केली असून, त्यांच्याकडून पाच गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. सोमनाथ उर्फ सोमाभाई चव्हाण (वय-30) आणि संतोष चंदू राठोड (वय-23) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा, सांगली, कोल्हापूर येथे दहशत निर्माण केलेला कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ उर्फ सोमाभाई चव्हाण (कालगाव, जि. सातारा) हा उंब्रज पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत सातारा मध्यवर्ती कारागृहात होता. त्याला कारागृहातून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीस अधिकार्यांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली व त्याच्याकडील चार गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याची सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे दहशत असून शूट ग्रुप नावाची टोळी आहे. याशिवाय तो आईसाहेब प्रतिष्ठान नावाची संघटना देखील चालवतो. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे 18 गुन्हे दाखल असून 2018 साली भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर जीवघेण्या हल्ल्यातील सोमनाथ हा मुख्य सूत्रधार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे तर संतोष चंदू राठोड (रा. तळेगाव दाभाडे) याला चिंचवड परिसरातून गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी अटक करून अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडील एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दोघांकडे एकूण पाच गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे होती. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.