दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे होणेकरिता २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघांतर्गत सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकांनी टाकलेल्या छाप्यात अक्षता मंगल कार्यालय, व्यवस्थापक महाराजा मंगल कार्यालय व उमेदवार सचिन पाटील अशा तिघांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्याबाबतचा खुलासा २४ तासात मागवला आहे. या ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य मिळून आले असल्याने या नोटिसा बजावल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी दूरध्वनीव्दारे आलेल्या दिवाळी साहित्य वाटपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील भरारी पथक क्र. ६ यास तक्रारीच्या ठिकाणी म्हणजेच मलटण येथील श्री. पांडुरंग गुजवंटे व बारदानवाले पवार यांचे राहते घर व गोडावून या ठिकाणी भरारी पथकाने भेट देवून परिसराची पाहणी केली. या पाहणीअंतर्गत पथकास येथे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
दुसर्या छाप्यात भरारी पथक क्र.५ व ६ यास तक्रारीच्या ठिकाणी म्हणेजच अक्षता मंगल कार्यालय, ठाकुरकी येथे भेट दिली असता मंगल कार्यालय व परिसराची पाहणी व चित्रीकरण करण्यात आले. या कार्यालयाच्या डायनिंग हॉलच्या रुममध्ये २०० पिशव्या दिवाळी साहित्याच्या मिळून आल्या. या पिशव्या भरारी पथकाने केल्या आहेत.
तिसर्या ठिकाणी दिवाळी साहित्य वाटपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील भरारी पथक क्र. ६ यास महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे कार्यालयात गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या ४ नग, ज्यावर पुढे व मागे ‘दादाची लाडकी बहीण’ एका स्त्रीचा फोटो, घड्याळयाचे चिन्ह, मा. अजितदादा यांचा फोटो तसेच २ प्लास्टिक पाकिटे व लेस व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचार प्रसिध्दीपत्रक मिळून आले. हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.