दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२१ । मुंबई । नोशन प्रेसने एप्रिल २०१९ मध्ये आपला डू-इट-युअरसेल्फ स्वयं-प्रकाशनाचा प्लॅटफॉर्म सुरु केला, याठिकाणी आता दर महिन्याला तब्बल २,००० इतक्या विक्रमी संख्येने पुस्तके येतात. म्हणजेच या प्लॅटफॉर्मवर दर पंचवीस मिनिटांनी एक नवे पुस्तक प्रकाशित होत असते. आजवर ३०,००० पेक्षा जास्त लेखकांनी त्यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि ५० कोटी रुपयांची पुस्तके विकली आहेत.
नोशन प्रेसचे सह-संस्थापक व सीईओ श्री. नवीन वाल्साकुमार यांनी सांगितले, “दोन वर्षांपूर्वी आम्ही हा प्लॅटफॉर्म सुरु केला तेव्हापासून अनेक लेखक आपला ब्रँड निर्माण करण्यासाठी आणि आपल्या लेखनकलेचा उपयोग अर्थार्जनासाठी करण्यासाठी याचा वापर करत आहेत. आमच्या आघाडीच्या लेखकांनी नोशन प्रेसवर आपली पुस्तके विकून १० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. छंद, आवड व कलाकौशल्यांच्या अर्थकारणाला आम्ही भारतात खतपाणी घालत आहोत, याठिकाणी लेखकांना स्वतःची आवड जपून त्यामार्फत अर्थार्जन देखील करता येत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.”
नोशन प्रेसच्या लेखकांमध्ये वय वर्ष ७ पासून थेट ९४ पर्यंतच्या लेखकांचा समावेश आहे. प्रकाशनाची क्षमता प्रत्येकाच्या हाती देण्याची किमया या प्लॅटफॉर्मने घडवली आहे. याठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, नोकरदार, गृहिणी, व्यावसायिक अशा अनेकांनी आपल्या आवडीच्या विषयांवर लिहिलेली पुस्तके प्रकाशित केली आहेत. इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि इतर भारतीय भाषांमध्ये लेखक आपली पुस्तके प्रकाशित करू शकतात. गूढ, भय, प्रणय कथा व कादंबऱ्या, आत्मकथा, व्यवस्थापन विषयांवरील पुस्तके, व्यवसायातील स्वयं-सहायता आणि कविता या सर्वाधिक लोकप्रिय शैली ठरल्या आहेत.
नोशन प्रेस पब्लिशिंग प्लॅटफॉर्मने एक असीमित इंटरफेस उपलब्ध करून दिला आहे जो लेखकांना त्यांची पुस्तके डिझाईन करून संपूर्ण जगभरात वितरणासाठी सक्षम करतो. सर्वात चांगली बाब म्हणजे हे संपूर्णपणे निःशुल्क आहे त्यामुळे खर्च ही प्रकाशनाच्या आड येणारी सर्वात मोठी समस्या दूर झाली आहे. याचाच अर्थ असा की ज्या लेखकांकडे पूर्ण आणि संपादित लेखन तयार आहे ते केवळ काही मिनिटांमध्ये पहिल्यांदाच काही लिहिले असलेला लेखक ते ज्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे असे लेखक हा मोठा टप्पा यशस्वीपणे पार करू शकतात.