कुस्ती न खेळणाऱ्यांनी आमच्यावर वस्तादगिरी करू नये – पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांचे चिरंजीव वनराज जाधव यांचा घणाघात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्हा तालीम संघाच्या उभारणीमध्ये अनेक नामवंत मल्लांचे योगदान आहे. यामध्ये ऑलम्पिक वीर दिवंगत पैलवान श्रीरंग जाधव यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या स्वागत कमानीला विरोध करणे म्हणजे आमच्या दैवताला विरोध करण्यासारखे आहे. साहेबराव पवार आणि त्यांच्या दोन चिरंजीवांनी सातारा जिल्हा तालीम संघाचा राजकीय आखाडा केला आहे, ही मक्तेदारी आम्ही निश्चितच मोडून काढू. ज्यांनी आयुष्यात कधीही कुस्ती खेळली नाही त्यांनी आम्हाला वस्तादगिरी शिकवू नये, असा जोरदार घणाघात पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांचे चिरंजीव वनराज जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा छत्रपती शाहू क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू आहे. मात्र सातारा जिल्हा तालीम संघाच्या संयोजकांमध्ये मानापमान नाट्याची खदखद सुरू आहे. या असंतोषाला वनराज जाधव, महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान धनाजी फडतरे, बलभीम शिंगरे, श्रीराम जाधव यांचे कनिष्ठ बंधू साहेबराव जाधव यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वाचा फोडली.

वनराज जाधव पुढे म्हणाले, साहेबराव पवार त्यांचे चिरंजीव दीपक पवार व सुधीर पवार यांनी जिल्हा तालीम संघाचा राजकीय आखाडा केला आहे. यामध्ये आखाड्यात पैलवान घडवण्याचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. यांच्या आजूबाजूला फक्त वाळू सम्राट असतात. त्यामुळे हा यांचा तालीम संघ आमच्या कल्पनेपलीकडच्या आहे. सातारा जिल्हा तालीम संघाच्या उभारणीमध्ये पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांचे मोठे योगदान आहे. ही तालीम घडवण्यामध्ये त्यांना लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब महाराज, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव देसाई या सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले. साताऱ्यामध्ये ज्यावेळेला तालीम नव्हती तेव्हा या तालमीच्या उभारणीसाठी श्रीरंग आप्पा जाधव यांनी अहोरात्र मेहनत आणि कष्ट घेतले. कोल्हापूरमध्ये खासबाग तालमी परिसरात कुस्ती क्षेत्रात योगदान देणाऱ्या नामवंत मल्लांची स्मृती स्तंभरूपाने जपण्यात आली आहे. या यादीमध्ये श्रीरंग आप्पा यांचेसुद्धा नाव आहे. जर कोल्हापूरची माती साताऱ्याच्या पैलवानाचा सन्मान करते मग साताऱ्याच्या मातीतच त्यांच्या नावाच्या कमानीला विरोध कशासाठी हवा ? कुस्ती क्षेत्रांमध्ये त्यांचे अतुल्य योगदान कधीही नाकारता येणार नाही. आप्पांनी पंजाब आणि महाराष्ट्रातील मल्लांना साताऱ्यात एकत्र आणून त्यांच्या लढती लावल्या. त्यामुळे सध्याच्या कधी कुस्ती न खेळलेल्यानी आम्हाला वस्तादगिरी शिकवायची गरज नाही असा घणाघात बलभीम शिंगरे यांनी केला.

वनराज जाधव पुढे म्हणाले, मुळात 1999 सालापासून जिल्हा तालीम संघाचे कार्यकारणी बरखास्त आहे. या कार्यकारणीचे कधीही ऑडिट झालेले नाही. श्रीरंग आप्पा जाधव यांच्या मृत्यूनंतर तालमीच्या कागदपत्रांचा पवार कुटुंबीयांनी उपयोग करून स्वतःची वर्णी तालीम संघाच्या कार्यकारिणीवर लावून घेतली आणि स्वतः तालीम संघाचे सर्वेसर्वा असल्याप्रमाणे ते वागत आहेत. पवार कुटुंबीयांनी एक तरी नामवंत मल्ल घडवल्याचा दाखला द्यावा. यांनी तालीम संघाच्या नूतनीकरणपेक्षा आपला फायदा कसा होईल हेच बघितले आहे. आमचा कुस्तीगीर परिषदेला विरोध नाही. ज्या स्पर्धा सध्या महाराष्ट्र केसरीच्या सुरू आहेत त्या अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू आहेत. मात्र जिल्हा तालीम संघामध्ये पवार घराण्याची एकाधिकारशाही सुरू आहे, त्याला आमचा स्पष्टपणे विरोध आहे. हा तालीम संघ कायदेशीरदृष्ट्या कसा ताब्यात घेता येईल याचे आमचे नियोजन सुरू असून ही एकाधिकारशाही आम्ही निश्चितच मोडून काढू असा विश्वास जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला श्रीरंग आप्पा जाधव यांच्या कन्या निवृत्त आयुक्त नीलम जाधव, साहेबराव जाधव, धनाजी फडतरे बलभीम शिंगरे तसेच कुस्ती क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती.


Back to top button
Don`t copy text!