
स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण समितीमध्ये फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे.
ही समिती ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. उपविभागीय अधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात.
समितीवर नियुक्त करण्यात आलेले अशासकीय सदस्य खालीलप्रमाणे:
- आमदार सचिन सुधाकर पाटील
- माजी नगरसेवक सचिन रमेश अहिवळे
- माजी नगरसेविका वैशाली सुधीर अहिवळे
- सामाजिक कार्यकर्ते व कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनी घनश्याम काकडे
या अशासकीय सदस्यांसोबत, गट विकास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार हे शासकीय सदस्य म्हणून या समितीवर कार्यरत असतात.
लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समावेशामुळे या समितीच्या कामकाजाला अधिक गती मिळून समाजातील पीडित घटकांना न्याय मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

